मागणी पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे

अभंग धार्मिक
Pocket

मागणी पर

पर धन कामिनी समूळ

पर धन कामिनी समूळ नाणी मना । नाही हे वासना माया केली ।।१।।

तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देई तुझ्या ।।२।।

निरपेक्ष वासना दे गा मज देवा । आणि तुझी सेवा आवडीची ।।3।।

शांतीची भूषणे मिरवती अंगी । वैष्णव आणि योगी म्हणावे ते ।।४।।

असो तो अकुळी असो भलते याती । माथा वंदी प्रीती जनी त्यासी ।।५।।

अनुक्रमणिके वर परत जा

1923

देवा आता ऐसा करी उपकार

देवा आता ऐसा करी उपकार । दुःखाचा विसर पाडी मज ।।1।।

तरिच हा जीव सुख पावे माझा । बरे केशीराजा कळो आले ।।2।।

ठाव देई चित्ता राखे पायापाशी । सकळ वृत्तींशी अखंडित ।।3।।

आस भय चिंता लाज काम क्रोध ।तोडावा संबंध यांचा माझा ।।4।।

मागणे ते एक हेची आहे आता । नाम मुखी संत संग देई ।।5।।

तुका म्हणे नको वरपंग देवा । घ्यावी माझी सेवा भावशुध्द ।।6।।

 

अनुक्रमणिके वर परत जा

देवा माझे मन लागो

देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥

नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥

पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥

आणिक मागणे नाही नाही देवा । एकाजनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥

भक्ती प्रेमाविण ज्ञान

भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजि ॥१॥

प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमाविन नाही समाधान ॥२॥

रांडवेनी जेवी शृंगार पै केला । प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा ॥३॥

एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवे सुरवाड जाणतील ॥४॥

अनुक्रमणिके वर परत जा

माझे चित्त तुझे पायी

माझे चित्त तुझे पायी ।  राहे ऐसे करी काही ।

धरोनिया बाही । भव हा तरी दातारा ॥१॥

चतुर तो शिरोमणी । गुण लावण्याची खाणी ।

मुगुट सकला मणी । धन्य तूची विठोबा ॥२॥

करी या तिमिराचा नाश । उदय होवोनी प्रकाश ।

तोडी आशापाश । करी वास हृदयी ॥३॥

पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता ।

तुका ठेवी माथा । पायी आता राखावे ॥४॥

अनुक्रमणिके वर परत जा

हेची देवा पै मागतो

हेची देवा पै मागतो । चरण सेवा अखंडित ॥१॥

वास देई पंढरीचा । सदा संग हरी दासाचा ॥२॥

जन्म हो का भलते याती । कधी न चुको हरिभक्ती ॥३॥

नाम म्हणे कमळापती । हेची देवा पुढता पुढती ॥४॥

अनुक्रमणिके वर परत जा

नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती

नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥

दावी रूप मज गोपिका रमणा । ठेऊ दे चरणा वारी माथा ॥२॥

पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ॥३॥

पुसता सांगेन हित गुज मत । बैसोनी एकांत सुख गोष्टी ॥४॥

तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ॥५॥

अनुक्रमणिके वर परत जा

1548

करीं हें चि काम

करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥1॥
लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥2॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥3॥

अनुक्रमणिके वर परत जा

आकल्प आयुष्य व्हावे

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥

कल्पनेची बाधा न हो कवने काळी । हि संत मंडळी सुखी असो ॥२॥

अहंकाराच वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकासी ॥३॥

नामम्हणे तया असावे कल्याण । जयामुखी निधान पांडुरंग ॥४११

अनुक्रमणिके वर परत जा

2246

कृपाळू सज्जन तुम्ही संत

कृपाळू सज्जन तुम्ही संत जन । एव्हढे कृपादान तुमचे मज ।।१।।

आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कीव माझी सांगा काकुळती ।।२।।

अनाथ अपराधी पतित आगळा । परी पाया वेगळा नका करू ।।३।।

तुका म्हणे तुम्ही निरवल्या वरी । मज मग हरि उपेक्षीना ।।४।।

अनुक्रमणिके वर परत जा

धर्माची तूं मूर्ती

धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥

मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥

करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥

जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥

अनुक्रमणिके वर परत जा

तुझा विसर नको माझिया जीवा
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥1॥
जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंद्रिये आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥2॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥3॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥4॥
तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥5॥

अनुक्रमणिके वर परत जा

3742

अव्दैती तों माझें नाहीं समाधान

अव्दैती तों माझें नाहीं समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥1॥

करूनी उचित देई हें चि दान । आवडे कीर्तन नाम तुझें॥ध्रु.॥

देवभक्तपण सुखाचा सोहळा । ठेवुनी निराळा दावी मज ॥2॥

तुका ह्मणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देई मज ॥3॥

1128

काय कीर्ती करूं लोक दंभ मान

काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥1॥

मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥

होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥2॥

अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥3॥

तुका ह्मणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥4॥

अनुक्रमणिके वर परत जा

3643

जेणें माझें चित्त राहे तुझ्या

जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देई प्रेमसुख ॥1॥

देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥

द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥2॥

तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥3॥

तुका ह्मणे तुझे जडोनियां पायीं । जालों उतराइऩ पांडुरंगा ॥4॥

४९५

करूनी विनवणी पायीं

करूनी विनवणी पायीं ठेवींला माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥

अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥

असो नमो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥२॥

तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥

अनुक्रमणिके वर परत जा

८७

कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार

कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥

तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥

तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥

तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥

1817

वाळूनियां जन सांडी

वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥1॥

आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥

नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥2॥

तुका ह्मणे ऐसी धरितों वासना । होइप नारायणा साहए मज ॥3॥

जोगी – अभंग १ /४३६

जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती

जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥

जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥

अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥

पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥

बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥

नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥५॥

तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥६॥

अनुक्रमणिके वर परत जा

उपाधि वेगळे तुम्ही निर्विकार

उपाधि वेगळे तुम्ही निर्विकार । कांहींच संसार तुम्हां नाहीं ॥१॥

ऎसें मज करुनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥२॥

नि :संग तुम्हासी राहणें एकट । नाही कटकट साहों येत ॥३॥

तुका म्हणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्फ़टिकाची ॥४॥

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

fifteen + 18 =