संत पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे

अभंग धार्मिक
Pocket

संत पर अभंग

शुद्धबीजा पोटीं

शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥

मुखीं अमृताची वाणी । देह (देवाचे) वेचावा कारणीं ॥ध्रु.॥

सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥

तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥

अनुक्रमणिके वर परत जा

1540

पवित्र तो देह वाणी पुण्यवंत

पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥1॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥2॥
काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥3॥
तुका म्हणे देव भक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥4॥

संत चरण रज लागता सहज

संत चरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळोनी जाय ।।१।।

मग रामनामे उपजे आवडी । सुख घडोघडी वाढू लागे ।।२।।

कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे । हृदयी प्रगटे रामरूप ।।३।।

तुका म्हणे साधन सुलभ गोमटे । परी उपतिष्ठे पूर्वपुण्य ।।४।।

1541

पाप ताप दैन्य जाय उठाउठीं

पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥1॥

ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिथॉ जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥

चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥2॥

भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥3॥

तुका ह्मणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥4॥

843

उजळलें भाग्य आतां

उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥1॥

संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥

संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥2॥

तुका ह्मणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥3॥

अनुक्रमणिके वर परत जा

धन्य आजि दिन झालें

धन्य आजि दिन । झालें संतांचे दर्शन ॥१॥

झाली पापा तापा तुटी । दैन्य गेलें उठाउठी ॥२॥

झालें समाधान । पायीं विसावलें मन ॥३॥

तुका म्हणॆ आले घरां । तोचि दिवाळी दसरा ॥४॥

तुम्ही संत मायबाप कृपावंत

तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥

अवतार तुम्हां धराया कारण । उद्धराया जन जड जीव ॥२॥

वाढवया सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥३॥

तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसें तुम्ही जगीं संतजन ॥४॥

 

===================================

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

three + 13 =