कर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का? धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More

ईतर लेख
Pocket

कर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का?*

    खूप छान वाटतं, जेव्हा आयुष्य समजू लागतं..
उकल होते, ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाची.. प्रत्येक गुंता सुटू लागतो अलगद. आहे तो क्षण जगून पुन्हा विरक्त होणं यासाठी कुठलीही कसरत करावी लागत नाही.. मन सजग होत जाते, ‘कर्मबंधन’ नव्याने जन्म घेऊ नये यासाठी..
   पूर्व कर्मबंधन नुसते प्रारब्धात कितीही कठीण, जटील असू देत, ते फक्त भोगल्यानेच संपतात असं नक्कीच नाही. कर्मबंधन ही कर्माने तयार होतात हे ‘सर्वमान्य’ आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी ‘चांगले कर्म’ (सुकर्म) करण्याची गरज असते. हे सुकर्म सुरू होतात ते, क्षमा या वरदानाने. हे वरदान प्रत्येक व्यक्तीला लाभलेलं आहे पण कोणी गंभीरतेने पाहत नाही याकडे.. क्षमा मागणं खूप सोपं आहे, पण कठीण आहे ते क्षमा करणं.. आणि या क्षमा न करण्यामुळेच आपल्या वर्तमानावर आपलाच ‘भूतकाळ’ अहोरात्र राज्य करत असतो कारण फक्त एक दिवस ‘मनात येणाऱ्या विचारांकडे लक्ष दिल्यास कळते, 70% विचार जुनेच असतात आणि ते इतके खोल रूजलेले असतात की उरलेले 30% नवे विचार कधी येऊन निघून जातात कळतंच नाही..
  सुकर्म म्हणजे ‘दानधर्म’ या व्याख्येपुरतेच मर्यादीत आहेत असं नाही. सुकर्म म्हणजे तुम्ही दुसऱ्यांबद्दल, स्वतःबद्दल काय विचार करता कारण ‘जसा विचार तसा आचार’ निसर्गाच्या नियमानुसार ‘क्रियेस प्रतिक्रिया ठरलेली असतेच’. तुम्ही काय विचार करता, एखाद्या क्रियेमागील (वागण्यामागील) तुमचा हेतू चांगला की वाईट?यानुसार तुमचे ‘कर्म बंधन’ तयार होते.. हे कर्मबंधनाचे चक्र ‘आवर्तनाच्या’ खेळात फिरत असते..
   सर्वांचा असा समज आहे की ‘कर्मभोग’ भोगूनच संपवावे लागतात.’ पण हे पूर्णसत्य नाही.. जर क्षमाशील वृत्ती ठेवल्यास ‘कर्म’ भोगावे लागत नाहीत.. आणि त्यास सत्कर्माची जोड दिल्यास जगणे अजून सहज होते. जसे क्षमा करणे गरजेचे आहे तसेच नवे कर्मबंध निर्माण होऊ नये याची दक्षता घेणे ही महत्वाचे आहे.. कर्मबंध तयार होतात ते ‘वासना, अहंकार, मद, मोह, मत्सर, लोभ’ यामुळे.. मानवी स्वभावात या मूलतः असतात.. या गोष्टींवर ताबा फक्त मनाला सकारात्मकतेचे वळण लावल्यास मिळवता येतो.
     ‘ नेहमी तक्रार करणे’ ही एक सवय 10 मधील 6 व्यक्तींना असते.. या सवयीमुळे ‘आयुष्यात जे काही चांगले आहे, ते दृष्टीआड होऊन जे वाईट आहे तेच नजरेसमोर राहते.. आणि तक्रार करणे वाढत जाते.. ‘काहीच चांगलं घडत नाही, सगळं नशिबावर सोडलं आहे, कर्माचे भोग आहेत, इत्यादी इत्यादी. सगळेच म्हणतो आपण, ‘मी ही कधी काळी ही वाक्य म्हटली आहेत’, यातूनही बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे, आयुष्यात जे काही चांगले आहे, तुमच्यातले गुण, भेटलेली माणसं, घडलेल्या सुखद घटना, छोट्यातली छोटी गोष्ट जी तुम्हाला आनंद देऊन गेली.. त्याबद्दल ‘आभार व्यक्त करणं तेही कृतज्ञतेने’, Say ‘Thank You’ What U Have and Had With Gratitude’..  हे आभार मानणं म्हणजे ‘आनंदाचे बीज मनाच्या जमिनीत रूजवून आनंदाची फळ प्राप्त करण्यासारखे आहे..
          सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही काय आणि कसे बोलता.. जर तुमचा सूर नकारात्मक असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात नकारात्मकता आकर्षित कराल त्याने पुन्हा ‘नव कर्माचे चक्र तयार होईल.  पण ते असह्य आयुष्याचे द्योतक असेल.. जर तुम्ही नेहमी सकारात्मक बोलाल, आयुष्यात बदल एका दिवसात कधीच घडत नाहीत.  पण जे बदल होतील ते खूप सुंदर, स्वप्नांच्या जवळ जाणारे असतील..
    ‘ वेळ आली की गोष्टी घडून येतात’ असंही आपण बोलतो.. काही अंशी ते खरं ही आहे पण काही अंशी कारण ‘प्रयत्नांती परमेश्वर’ अशी म्हण प्रचलित झालीच नसती. कारण वेळेचं गणित वेळेलाच माहीत पण ‘वागायचं कसं हे आपल्या हातात आहे.’ जर डॉक्टरने सांगितलं आहे, ‘तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्ही काही महिनेच जगणार..’ यात तुम्ही ठरवायचं , ‘हसायचं की घड्याळाच्या काट्याकडे पाहत रडायचं’..जर वागणं निसर्गनियमांनुसार योग्य असेल तर ‘वेळेचं घड्याळही बदलतं’.. कारण ‘कभी कभी वक्त आता नहीं उसे लाना पड़ता हैं..’ हे काम फक्त ‘माणूसच’ करू शकतो कारण त्याला बुद्धीचं ‘वरदान’ आहे..
     आयुष्य जगण्याचं तंत्र ‘कर्मचक्रातच’ दडलेलं आहे.. जन्म होतो तो नव्याने जगण्यासाठी.. स्वतःला जाणून  घेण्यासाठी.. आम्ही मात्र गुंतत जातो.. कर्मबंधात अडकण्यासाठी.
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

4 × one =