नवनाथ भक्तिसार

श्री नवनाथ भक्तिसार-कथासार अध्याय २ रा दुसरा ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे

ग्रंथ धार्मिक वारकरी ग्रंथ
Pocket

श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २ रा दुसरा ओवीबद्ध मराठी

 

श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय २

श्रीगणेशाय नमः जयजयाजी मूळपीठवासिनी ॥ पुंडलीकाच्या गोंधळालागोनी ॥ भक्तवरदे भवानी ॥ उभी अससी माये तूं ॥१॥ संत गोंधळी विचक्षण ॥ कंठीं मिरवितां तुळसीभूषण ॥ तेचि माळा सुलक्षण ॥ जगामाजी मिरविसी ॥२॥ घालिती तुझा प्रेमगोंधळ ॥ कामक्रोधांचे देती बळ ॥ गीतसंगीत सबळ ॥ गुण गाती माये तुझे ॥३॥ असो ऐशा गोंधळप्रकरणीं ॥ संतुष्ट होसी माय भवानी ॥ तरी या ग्रंथगोंधळी येऊनी ॥ साह्य करी जननीये ॥४॥ मागिल्या अध्यांयी रसाळ कथन ॥ गणादि सकळांचे केले नमन ॥ उपरी मच्छिंद्राचें जनन ॥ यथाविधी कथियेलें ॥५॥ आतां पुढें श्रवणार्थी ॥ बैसले आहेत महाश्रोती ॥ तयांची कामना भगवती ॥ पूर्ण करावया येई कां ॥६॥ तरी श्रोतीं सिंहावलोकनीं कथन ॥ श्रीदत्तदेव आणि उमारमण ॥ भागीरथीविपिनाकारण ॥ पहात पहात चालिले ॥७॥ जैसे फलानिमित्त पक्षी ॥ फिरत राहती वृक्षोवृक्षीं ॥ त्याचि न्यायें उभयपक्षी ॥ गमन करिती तीरातें ॥८॥ सहज चालती विपिनवाटी ॥ तों मच्छिंद्र देखिला त्यांनीं दृष्टीं ॥ बाळतनू पाठपोटीं ॥ अस्थि त्वचा उरल्या पैं ॥९॥ जटा पिंगट नखें जळमट ॥ फंटकारी पादांगुष्ठ ॥ कार्पासमय झाली दृष्ट ॥ त्वचा लिपटली अस्थींसी ॥१०॥ सर्वांगे शिरा टळटळाट ॥ दिसती अवनी नामपाठ ॥ ध्वनिमात्र शब्द उठे ॥ चलनवलन नयनांचें ॥११॥ ऐसा पाहूनि तपोजेठी ॥ विस्मयो करिती आपुले पोटीं ॥ म्हणती ऐसा कलीपाठीं ॥ तपी नेणों कोणीच ॥१२॥ अहो विश्वामित्रप्रकरणी ॥ दिसतो तपी हा मुगुटमणी ॥ तपार्थ कामना अंतःकरणीं ॥ करणी कोण यातें उदेली ॥१३॥ मग दत्तासि म्हणे आदिनाथ ॥ मी स्थिरता राहतों महीं येथ ॥ तुम्हीं जाऊनि कामनेतें ॥ विचारावें तयातें ॥१४॥ कवणा अर्थी कैसा भाव ॥ उचंबळला कामार्णव ॥ तरी लिप्सेचा समूळ ठाव ॥ काय तोही पहावा ॥१५॥ येऊनि त्यापरी अत्रिनंदन ॥ शिवानंदसूक्तिक सुढाळ रत्न । श्रवणपुटीं स्वीकारुन ॥ तयापासीं पातला ॥१६॥ उभा राहोनि समोर दृष्टी ॥ म्हणे महाराजा तपोजेठी ॥ कवण कामना उदेली पोटीं ॥ तें वरदवरातें मिरवावें ॥१७॥ ऐसे वरदाचे वागवट ॥ मच्छिंद्र श्रवण करितां झगट ॥ नम्रभाव धरुनि प्रकट ॥ तयालागीं बोलत ॥१८॥ कर्णी शब्द पडतां सुखस्थिती ॥ दृष्टी काढोनियां वरती ॥ पाहता झाला दत्ताप्रती ॥ महाराज योगी तो ॥१९॥ भ्रूसंकेतें करोनि नमन ॥ दाविता झाला निजनभ्रपण ॥ जो कीम ईश्वरी आराधन – ॥ प्राप्तीलागी उदेला ॥२०॥ बोले महाराजा कृपासरिता ॥ तुम्ही कोण तें सांगावें आतां ॥ द्वादश वर्षे काननीं लोटतां ॥ मानव नातळे दृष्टीसी ॥२१॥ तरी त्वच्चित्त सदैव भवानी ॥ प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धें धरणीं ॥ तरी प्रसादनग अभ्युत्थानीं ॥ स्थापूनि जाई महाराजा ॥२२॥ ऐसें तयाचें वागुत्तर ॥ ऐकोनि तोषला अनसूयाकुमर ॥ म्हणे वा रे नामोच्चार ॥ दत्त ऐसें मज म्हणती ॥२३॥ जो व्याघ्रपदीं ऋषिजन्म ॥ अत्रि ऐसें तया नाम ॥ तयाचा सुत मी दासोत्तम ॥ महीलागीं आधारलों ॥२४॥ तरी असो ऐसी गोष्टी ॥ कवण कामना तुझ्या पोटीं ॥ उदेली जे तपोजेठी ॥ शब्दसंपुटीं मिरवीं कां ॥२५॥ येरु म्हणे वरदोस्तु ॥ कामना वरी एक भगवंतु ॥ ऐसें वदता झाला अतीतु ॥ पदावरी लोटला ॥२६॥ जैसी सासुर्याे बाळा असतां ॥ अवचट दृष्टी पडे माता ॥ हंबरडोनि धांवोनि येतां ॥ ग्रीवे मिठी घालीतसे ॥२७॥ किंवा अवचट वत्सा भेटतां गाय ॥ मग प्रेम लोटी चित्त सदैव ॥ तेणेंपरी मच्छिद्र मोहें ॥ पदावरी लोटला तो ॥२८॥द्वादश वर्षे तपाचे श्रम ॥ ते आजि फळले मानूनि उत्तम ॥ सांडोनि सकळ आपुला नेम ॥ पदावरी लोटला तो ॥२९॥ परी तपश्रमाचे बहुत क्लेश ॥ हदयीं गहिंवरले दुःखलेश ॥ नेत्रींचे झरे विशेष ॥ पदावरी लोटले तैं ॥३०॥ तेणें झालें पादक्षालन ॥ पुढती बोले करी रुदन ॥ हे महाराजा तूं भगवान ॥ महीमाजी मिरविशी ॥३१॥ रुद्र विष्णु विरिंची सदय ॥ त्रिवर्गरुपी देह ऐक्यमय ॥ ऐसें असोनि सर्वमय ॥ साक्षी महीं अससी तूं ॥३२॥ तरी येऊनि सर्वज्ञमूर्ती ॥ असोनि माझा विसर चित्तीं ॥ पडलासे किमर्थ अर्थी ॥ अपराध गळीं सेवोनियां ॥३३॥ ऐसें म्हणोनि वारंवार ॥ ग्लानींत करी नमस्कार ॥ क्लेशनगीचें चक्षुद्वार ॥ सरितालोट लोटवी ॥३४॥ तरी तो अत्यंत शांत दाता ॥ म्हणे बा हे न करी चिंता ॥ प्रारब्धर्मदराचळाची सरिता ॥ ओघ ओघील आतांचि ॥३५॥ मग वरदहस्ते स्पर्शोनि मौळी ॥ कर्णी ओपीत मंत्रावळी ॥ तेणें अज्ञानदशाकाजळी ॥ फिटोनि गेली तत्काळ ॥३६॥ जैसें माहात्म्य भारती ॥ उदयदृष्टी करितां गभस्ती ॥ मग अंधकाराची व्याप्ती ॥ फिटोनि जाय तत्काळ ॥३७॥ तेवी दत्त वरदघन ॥ वोळतां गेलें सकळ अज्ञान ॥ मग चराचर सकळ जीवन ॥ जैसें हेलावलें दृष्टीसी ॥३८॥ नाठवे कांहीं दुजेपण ॥ झालें ऐक्य ब्रह्मसनातन ॥ जैसें उदधी सरिताजीवन ॥ जीवना जीवनसम दिसे ॥३९॥ ऐसी झालिया जीवनसम दृष्टी ॥ आत्रेय धरिता झाला पोटीं ॥ म्हणे बा रे योगी धूर्जटी ॥ इंदिरावर कोठें तो सांग ॥४०॥ येरु म्हणे जी ताता ॥ ईश्वरावांचोनि नसे वार्ता ॥ जळीं स्थळीं काष्ठीं महीं पर्वता ॥ ईश्वर नांदे सर्वस्वीं ॥४१॥ ऐसें ऐकोनि वागुत्तर ॥ ग्रीवा तुकवी अत्रिकुमर ॥ मग सच्छिष्याचा धरोनि कर ॥ चालता झाला महाराज तो ॥४२॥ सहज चालतां चाले नेटीं ॥ आले आदिनाथ प्रेमदृष्टी ॥ मच्छिंद्र मूर्धकमळधाटी ॥ पदावरी वाहातसे ॥४३॥ शिवें पाहूनि मंददेहीं ॥ म्हणे हा पूर्वी नारायण कवी ॥ मग प्रेमसरितेच्या लोटप्रवाहीं ॥ धरिला हदयीं तत्काळ ॥४४॥ मग त्रिवर्ग येऊनि त्या स्थानीं ॥ दत्तासी म्हणे पंचमूर्धनी ॥ या शिष्यातें अभ्यासोनी ॥ सकळ सिद्धी मिरवीं कां ॥४५॥ जें वेदकारणाचें निजसार ॥ जें सर्वोपकाराचें गुहागर ॥ सकळ सिद्धींचें अर्थमाहेर ॥ निवेदी तूं महाराजा ॥४६॥ जारणमारण उच्चाटण ॥ शापादपि निवारण ॥ शरादपि अस्त्रादिनिबर्हण मंत्रशक्ती त्या वरत्या ॥४७॥ जो जैसा कर्मविजे पाठ ॥ होती दैवतें वरती भेट ॥ वंशवरद वाक्पट ॥ मस्तकीं स्थापोनि जाताती ॥४८॥ वरुण आदित्य सोमस्वामी ॥ भौमशक्रादि यमद्रमी ॥ शिवशक्ति कामतरणी ॥ वर देऊनि उठविले ॥४९॥ विष्णू विरिंची कृपाकृती ॥ वरदबीजे देऊनि शक्ति ॥ ते मंत्र अंखें अपारगती ॥ हदयामाजी हेलावला ॥५०॥ असो सद्विद्येचा मंदराचळ ॥ उभवोनियां अत्रिबाळ ॥ क्षणमात्र वेंचूनि केला सबळ ॥ सिद्धतरणी जेउता ॥५१॥ नागबकादि वातास्त्र ॥ नगनागादि महावज्र ॥ पावक जलधी अस्त्र पवित्र ॥ सांगोपांग तो झाला ॥५२॥ ऐसें सांगोनि सांगोपांग ॥ जाता झाला योगमार्ग ॥ परी सांप्रदाय योजूनि योग ॥ कानफाडी मिरवला ॥५३॥ पुढील भविष्य जाणोन ॥ सांप्रदाय केला निर्माण ॥ षडरुप जोगीदर्शन ॥ कानफाडी मिरवले ॥५४॥ नाथ ऐसें देऊनि नाम ॥ शिंगी शैली देऊनि भूषण ॥ ऐसें परिकरोनि प्रमाण ॥ अत्रिनंदन पैं गेला ॥५५॥ यापरी तो मच्छिंद्रनाथ ॥ नमोनि निघाला आदिनाथ ॥ महीवरी नाना तीर्थे ॥ शोध करीत चालिला ॥५६॥ तो भ्रमण करितां सप्तश्रृंगीं ॥ येता झाला महायोगी ॥ अंबिका वंदोनि मनोमार्गी ॥ सप्रेम स्थितीं गौरविली ॥५७॥ करीत वैखरीं अंबास्तवन ॥ तों आलें कल्पने मन ॥ कीं कांहीं तरी कवित्वसाधन ॥ लोकांमाजी मिरवावें ॥५८॥ कवित्व तरी करावें ऐसें ॥ कीं उपयोगी पडे सर्व जगास ॥ मग योजोनियां शाबरीविद्येस ॥ मनामाजी ठसविली ॥५९॥ यापरी अनेक कल्पना करीत ॥ कीं शाबरीविद्येंचे करावें कवित ॥ परी वरदगुंतीं वश्य दैवत ॥ केउते रीतीं होतील ॥६०॥ मग अंबेपासी अनुष्ठान ॥ करिता झाला सप्तादिन ॥ वेदबीजाचें अभिषिंचन ॥ अंबेलागी करीतसे ॥६१॥ तेणें जागृत महिषमर्दिनी ॥ होऊनि बोले तयालागोनी ॥ बा रे कवण कामना मनीं ॥ वेधली तें मज सांग ॥६२॥ येरु ह्नणे वो जगज्जननी ॥ शाबरी विद्येचें कवित्व कामनीं ॥ वेधक परी वरालागोनी ॥ उपाय कांहीं मज सांग ॥६३॥ उपरी बोले चंडिका भवानी ॥ पूर्णता पावशी सकळ कामनीं ॥ मग त्या सिद्धाचा हात धरोनी ॥ मार्तंडपर्वतीं पैं नेला ॥६४॥ तेथें नागवृक्ष अचिंत्य थोर ॥ तरु नोहे तो सिद्धीचें माहेर ॥ दृश्यादृश्य केलें पर ॥ महातरु नांदतसे ॥६५॥ तेथें करोनि बीजी हवन ॥ तरु केला दृश्यमान ॥ तो कनकवर्ण देदीप्यमान ॥ निजदृष्टीं देखिला ॥६६॥त्या तरुच्या शाखोपांतीं ॥ नाना दैवतें विराजती ॥ मग नामाभिधानें सकळ भगवती ॥ देवतांची सांगे त्या ॥६७॥ तीं दैवतें धुरंधर बावन्न वीर ॥ मूर्तिमंत असती तरुवर ॥ नरसी काळिका महिषासुर ॥ म्हंमदा झोटिंग वीरभद्र ॥६८॥ वेताळ मारुती अयोध्याधीश ॥ कोदंडपाणी रामेश ॥ सूर्य नामीं तेथ द्वादश ॥ मूर्तिमंत नांदतसे ॥६९॥ पायरी जलदेवता असती नव ॥ कुमारी धनदा नंदा नांव ॥ विमळा मंगळा ज्ञानप्राप्तिव ॥ लक्ष्मी आणि विख्याता ॥७०॥ यापरी चंडा मामुंडा ॥ रंडा कुंडा महालंडा ॥ अप्सरा जोगिनी शंडवितंडा ॥ तरुभागी विराजल्या ॥७१॥ काळव्याळ वीरभैरव ॥ भस्मकेत सिद्धभैरव ॥ रुद्र ईश्वरी गण भैरव ॥ अष्टभैरव हे असती ॥७२॥ यापरी शस्त्रअस्त्रयामिना ॥ दमि धूमि कुचित भामिना ॥ सातवी ज्वाळा शुभानना ॥ वृक्षावरी त्या असती ॥७३॥ यापरी शंखिनी डंखिणी यक्षिणी ॥ त्या समुच्चयें असती बारा जणी ॥ अष्टसिद्धी महाप्रकरणी ॥ वृक्षावरी विराजल्या ॥७४॥ प्राप्ति प्राकाभ्या अणिमा गरिमा ॥ ईशित्व वशित्व प्रथिमा महिमा ॥ एवंच अष्टसिद्धी नामा ॥ तरुवरी विराजल्या ॥७५॥अष्टसिद्धींसमवेत ॥ बावन्न वीर सकळ दैवत ॥ तया तरुच्या शाखा व्यक्त ॥ करोनियां बैसले ॥७६॥ ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ॥ तीं पहाती न बोलती कांहीं ॥ यावरी अंबिका करी काई ॥ निवे दोनी नाथातें ॥७७॥ बा रे ऋष्यमूकपर्वतस्थानी ॥ ब्रह्मगिरीच्या निकटवासनीं ॥ अंजनपर्वत तयासी म्हणी ॥ नदी काचित आहे बा ॥७८॥ दक्षिणओघीं सरिता जात ॥ ते कांठीं महाकाळी दैवत ॥ स्थानें असती जाण तेथ ॥ भगवतीतें नमावें ॥७९॥ तेथोनि पुढें दक्षिणपंथीं ॥ सरितापात्रें जावें निगुती ॥ परी बा तेथें श्वेतकुंडें असती ॥ तोयमरित महाराजा ॥८०॥ तरी शुक्लांवेल कवळूनि हातीं ॥ एक एक सोडावी कुंडाप्रती ॥ ऐशीं कुंडें एकाशतीं ॥ हस्तिपदसमान आहेत ॥८१॥ परी तितुकें पूजन कोरडे वेलीं ॥ सकल सरल्या परत पाउलीं ॥ पाहात यावें ती वल्ली ॥ सकळ कुंडांमाझारी ॥८२॥ जया कुंडांत सजीव वेल ॥ दृष्टिगोचर बा होईल ॥ तया कुंडीं स्नान वहिले ॥ करोनि जीवन प्राशिजे ॥८३॥ तें जीवन प्राशितां निश्वित ॥ मूर्च्छा येईल एक मुहूर्त ॥ तै बारा नाभीं जपावे आदित्य ॥ मूच्छेंमाजी असतां पैं ॥८४॥ मग प्रत्यक्ष होईल तमांतक ॥ मौळी घ्यावा तो हस्तक ॥ पुढें काचकूपिका भरोनि उदक ॥ येथें यावें महाराजा ॥८५॥ मग बारा नामीं करोनि सिंचनीं ॥ तरु न्हाणावा तया जीवनीं ॥ तेव्हां दैवतें प्रसन्न होऊनी ॥ वरदान तूंतें देतील बा ॥८६॥ परी एक वेळां न घडे ऐसें ॥ खेपा घालाव्या षण्मास ॥ एक एक दैवत एक खेपेस ॥ प्रसन्न होईल महाराजा ॥८७॥ ऐसें सांगोनि माय भगवती ॥ गेली आपुले स्थानाप्रती ॥ येरु पावला अंजनपर्वतीं ॥ सरितापात्री ओघातें ॥८८॥ काळी महाकाळी देवतांस ॥ नमोनि निघाला काननास ॥ करीं कवळोनि शुक्लवेलास ॥ कुंडांलागी शोधीतसे ॥८९॥ असो एकशतं कुंडें पाहोन ॥ तितुक्यांत शुक्लवेल स्थापोन ॥ पुन्हां पाहे परतोन ॥ सकळ कुंडांमाझारी ॥९०॥तों आदित्यनामें कुंडीं तीव्र ॥ ते वेल पाहे साचोकार ॥ तों दृष्टीं पडले पल्लवाकार ॥ स्नान तेथें सारिलें ॥९१॥ स्नान झालिया उदकपान ॥ होतांचि व्यापिलें अतिमूर्च्छेन ॥ परी द्वादश नामीं मंत्रसाधन ॥ सोडिलें नाहीं तयानें ॥९२॥ परी मूर्च्छा ओढवली अतितुंबळ ॥ शरीर झालें अतिविकळ ॥ स्वेद नेत्रें गेला अनिळ ॥ देह सांडोनि तयाचा ॥९३॥ ब्रह्मांडांतोनि अंतर्ज्योती ॥ तीही वेंधों पाहे अंतीं ॥ तरी आदित्यनांवें जाण होतीं ॥ जपालागीं नित्य करीत ॥९४॥ जसें जागृती घडोनि येत ॥ तोंचि स्वप्नीं जीव घोकीत ॥ त्याचि न्यायें उरला हेत ॥ जीव जपी अर्का तो ॥९५॥ ऐसे संकट घटतां थोर ॥ खालीं उतरला प्रभाकर ॥ कृपें स्पर्शोनि नयनीं कर ॥ सावध केला महाराज ॥९६॥ मग कामनेचा पुरवोनि हेत ॥ मस्तकीं ठेविला वरदहस्त ॥ म्हणे बा रे योजिला अर्थ ॥ सिद्धी पावसी येणें तूं ॥९७॥ ऐसें बोलोनि आदित्य गेला ॥ तेणें काचकुपिका भरोनि वहिला ॥ पुन्हा मार्तडपर्वतीं आला ॥ येऊनि नमी अश्वत्थ ॥९८॥ आदित्यनामें करोनि चिंतन ॥ आदित्य तेथें झाला प्रसन्न ॥ म्हणे महाराजा काय कामना ॥ निवेदावी मज आतां ॥९९॥ येरु म्हणे कवित्व करीन ॥ तया साह्य तुवां होऊन ॥ मंत्रविद्या तव नामानें ॥ फळास येवो महाराजा ॥१००॥ अवश्य म्हणूनि तमभंजन ॥ मंत्रविद्या साध्य करुन ॥ बांधला गेला जलजलोचन ॥ मंत्रशक्तिकार्यार्थ ॥१॥ ऐसा सप्त मास येरझारा करुन ॥ दैवतांसी करोनि घेतलें प्रसन्न ॥ मग शाबरीविद्येचा ग्रंथ निर्मून ॥ बंगाल देशीं चालता झाला ॥२॥ असो ऐसी गौरक्षकथा ॥ वदला आहे किमयागारग्रंथा ॥ तेथें किमयांची स्थानें सर्वथा ॥ सांगतलीं आहेत जीं ॥३॥ परी प्रथम अवघड करणें ॥ तें मानवातें न ये घडोन ॥ ते अवतारी असती परिपूर्ण ॥ म्हणोनी घडलें तयांसी ॥४॥ परी सांगावया कारण ॥ स्वमुखें गौरक्ष वदला आहे कथन ॥ त्या ग्रंथाचा आश्रय पाहून ॥ नवही योगी वर्णिले ग्रंथीं ॥५॥ तरी श्रोतीं तया ग्रंथा ॥ दोष न ठेवावा सर्वथा ॥ संशय आलिया किमयागारग्रंथा ॥ विलोकावें विचक्षणीं ॥६॥ मुळावेगळें कांहीं कथन ॥ येत नाहीं जी घडोन ॥ म्हणोनि सकळ संशय सांडोन ॥ ग्रंथ श्रवणीं स्वीकारा ॥७॥ यापरी बळेचि चाळवोनि दोष ॥ निंदोनि जो कां मोडील हरुप ॥ बिकल्पपंथी मिरवितां जगास ॥ पावेल वंशबुडी तो ॥८॥ आणिक वाणी जाईल झडोन ॥ नरकीं पडेल सप्त जन्म ॥ आणि जन्मोजन्मीं शरीरेंकरोन ॥ क्षयरोग भोगील तो ॥९॥ असो आतां तीर्थउद्देशीं ॥ मच्छिंद्र गेला बंगालदेशीं ॥ तेथे फिरत तीर्थवासीं ॥ हेळा १ समुद्रीं पातला ॥११०॥ तये देशीं चंद्रगिरि ग्राम ॥ तेथे नरसिंहाचा झाला जन्म ॥ सुराज पिता विप्रोत्तम ॥ कृतिदेवीकृशीं आचारनेम ॥ सकळ धर्म पाळी तो ॥१३॥ आधीं तपन यजन २ याजन ॥ स्नानसंध्यामाजी निपुण ॥ तयाची कांता गुणोत्तम ॥ सरस्वती नामें मिरवतसे ॥१४॥ सदा सुशील लावण्यखाणी ॥ कीं नक्षत्रपातीं विराजे मांडणीं ॥ वाटे काम इच्छा धरुनि मनीं ॥ तेथें येऊनि बैसला ॥१५॥ कीं स्वर्गी मेघांचे मंडळ पाहीं ॥ तेथोनि चपळा उदया ये ही ॥ कीं अर्क होऊनि गृहीं गोसावी ॥ तेजभिक्षा मागतसे ॥१६॥ जियेचे अधरपंबळदेठीं ॥ द्विज विराजती वरती थाटीं ॥ जैसे रत्न हेमी शेवटीं ॥ स्वतेजें तगटीं ॥ मिरवितसे ॥१७॥ भाळ विशाळ सोगयांजन ॥ कुंकुमरसें शोभलें गहन ॥ मुक्तानक्षत्रकबरीं संगीन ॥ चंद्राबिजोरा विराजवी ॥१८॥ नासिक सरळाकृती ॥ ते शुक्तिकारत्नहेमगुप्ती ॥ मुक्तनळे जैसे गभस्ती ॥ नासिकपात्रीं विराजले ॥१९॥ कर्णबिंदी वलयाकृती ॥ हेममुगुटीं ढाळ देती ॥ रत्नताटंके ॥ नक्षत्रपातीं ॥ करुं वश्य ती पातले ॥१२०॥ असो ऐसी श्रृंगारखाणी ॥ सकळ संपत्ति नटली कामिनी ॥ रुपंवती सकळ गुणीं ॥ जगामाजीं मिरवतसे ॥२१॥ परी उदरीं नाहीं संतान परम ॥ तेणें उचंबळोनी योगकाम ॥ न आवडे धंदा धामाश्रम ॥ सदा वियोग बाळाचा ॥२२॥ देवदेव्हारे उपाय अनेक ॥ करिती झाली कामनादिक ॥ परी अर्थ कोठें उदयदायक ॥ स्वप्नामाजीं आतळेना ॥२३॥ नावडे आसन वसन गात्र ॥ विकळ मिरविती निराशगात्र ॥ शून्यधामीं चित्त ॥ पवित्र नांदणुकी नांदतसे ॥२४॥ प्रपंच मानिती अतिहीन ॥ जैसें दीपाविण शून्य सदन ॥ कीं सकळस्वरुपीं दाराहरण ॥ परी नासिकहीन मिरवतसे ॥२५॥ कीं वज्राउपरी गिरे गोमट ॥ परी वसतीस दिसे तळपट ॥ तेथें पाहतां दानवी पिष्ट ॥ कांडिती ऐसें वाटे कीं ॥२६॥ कीं तरुविण अरण्य कर्कश ॥ कीं सरितांविन जैसे विरस ॥ मग तें क्षणैक पशुमात्रास ॥ भयंकर दरी वाटतसे ॥२७॥ कीं शरीरीं चांगुलपण ॥ परिधानिलें वस्त्रानें भूषण ॥ परि चतुःस्कंधीं शवदर्शन ॥ सुगम कांहीं वाटेना ॥२८॥ तें शरीर घ्राणाविण ॥ आप्तवर्गातें वाटे हीन ॥ तेवीं सर्व उपचार कांतेलागोन ॥ संसार हीन वाटतसे ॥२९॥ ऐसें असतां भावस्थिती ॥ गृही दर्शिली योगमूर्ती ॥ नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती ॥ अलक्ष सवाल वदतसे ॥१३०॥ तंव ते कांतेनें पाहूनि त्यातें ॥ चरणीं लोटली शोकभरितें ॥ आणोनि शीघ्र वस्त्र आसनातें ॥ विराजविला महाराज ॥३१॥ बैसोनि नाथानिकत ॥ सांगती वियोग शोक उल्हाट ॥ हदयीं भरोनि नेत्रपाट ॥ क्लेशांबु मिरविले ॥३२॥ म्हणे महाराजा अनाथनाथा ॥ तुम्ही सर्वगुणी विद्येसी जाणतां ॥ तरी मम हदयीं शोकसरिता ॥ नाशजळा वाटतसे ॥३३॥ म्हणे तरी यातें उपाव कांहीं ॥ सांगा म्हणोनि लागतें पायीं ॥ पुन्हां स्पर्शोनि मौळी प्रवाहीं ॥ कवण शब्दा वाढवीतसे ॥३४॥ पुढें ठेवोनि भिक्षान्न ॥ पुन्हां कवळी मोहें चरण ॥ आणि नेत्रां घनाची वृष्टि जीवन ॥ पदमहीतें सिंचीतसे ॥३५॥ तेणें मच्छिंद्रचित्तसरिते ॥ मोहसराटे अपार भरुते ॥ शब्दें तोयओघ मिरवत ॥ होतें सुखसरितेसी ॥३६॥ म्हणे वो साध्वी क्लेशवंत ॥ किमर्थ कामनीं चित्त ॥ तें मज वद कीं चित्तार्थ ॥ सकळां मुक्ती लाहील कीं ॥३७॥ ऐसे शब्देवर्गउगमा ॥ ऐकोनि बोले द्विजराम ॥ म्हणे महाराज योगद्रुमा ॥ संतती नाही वंशातें ॥३८॥ तेणें वियोगें खदिरांगार ॥ झगट करितो अतितीव ॥ तेणेंकरोनि चित्त शरीर ॥ दाह पावे महाराजा ॥३९॥ ऐसे क्लेश चित्तशक्ती ॥ कदा न वसे धैर्यपाठी ॥ दुःख गोंधळी शोकपातीं ॥ नृत्य करी कवळूनी ॥१४०॥ तरी हा शोकवडवानळ ॥ जाळूं पाहे धैर्यजळ ॥ त्यांत स्वामींनीं होऊनि दयाळ ॥ शोकग्नीतें विझवावें ॥४१॥ ऐसी वदतां वागभगवती ॥ प्रेमा उदेला नाथचित्तीं ॥ मग आदित्यनामें मंत्रविभूनी ॥ महाशक्ती निर्मीतमे ॥४२॥ नाथाकरी भस्माचिमुटी ॥ तेथें वीर्य करी राहाटी ॥ मग तें भस्म तपोजठी ॥ तिये हातीं वोपीतसे ॥४३॥ म्हणे माय वो शुभाननी ॥ हे भस्मचिमुटी करीं कवळूनी ॥ घेई सेवीं आपुले शयनीं ॥ निशीमाजी जननीये ॥४४॥ म्हणतील भस्म नोहे पूर्ण गभस्ती ॥ जो हरिनारायणउदयो कीर्ति ॥ प्रभा मिरवोनि त्रिजगतीं ॥ मोक्षमांदुसा मिरवेल ॥४५॥ तरी तूं सहसा हळवटपणी ॥ कामना नवरीं भस्मासनीं ॥ म्यांही पुढील भविष्य जाणोनी ॥ चिद्भवानी वदविली ॥४६॥ या भस्माची प्रतापस्थित ॥ तव उदरीं होईल जो सुत ॥ तयातें अनुग्रह देऊनिया स्वतः ॥ करीन सरस ब्रह्मांडीं ॥४७॥ मग तो सुत न म्हणे माय ॥ सकळ सिद्धींचा होईल राय ॥ जैसा खगी नक्षत्रमय ॥ शशिनाथ मिरवेल ॥४८॥ मग तो न माय ब्रह्मांडभरी ॥ कीर्तिरश्मीचे तेजविवरीं ॥ आणि वंद्य होईल चराचरीं ॥ मानवदानवदेवादिकां ॥४९॥ तरी माये संशयो न धरितां ॥ भक्षीं भस्म सांडोनि चिंता ॥ ऐसी सांगोनि सकळ वार्ता ॥ नाथ उठे तेथूनि ॥१५०॥ यावरी बोले शुभाननी ॥ कीं महाराजा योगधामीं ॥ तुम्ही केव्हां याल परतोनी ॥ सुता अनुग्रह वोपावया ॥५१॥ नाथ ऐकोन बोले तीतें ॥ म्हणे ऐक वो सदगुणसरिते ॥ पुन्हां येऊनि देई उपदेशातें ॥ द्वादशवर्पाउपगंतीं ॥५२॥ ऐसे वदोनि शब्द सुढाळ ॥ निघता झाला सिद्धपाळ ॥ तीर्थउद्देशीं नानास्थळ ॥ महीलागीं लंघीतसे ॥५३॥ येरीकडे भस्मचिमुटी ॥ सदृढ बांधोनि ठेविली गांठीं ॥ हरुष न राहे पोटीं ॥ उचंबळोनि दाटलासे ॥५४॥ मग ती सर्वेचि नितंबिनी ॥ जाऊनि बैसे शेजारसदनीं ॥ तेथें सात पांच व्रजवासिनी ॥ येऊनि त्या स्थानीं बैसल्या ॥५५॥ ते त्या जाया शब्दरहाटीं ॥ सहज बोलती प्रपंचगोष्टी ॥ त्यांत ही जाया हर्ष पोटीं ॥ कथा सांगे ती आपुली ॥५६॥ म्हणे माय वो ऐका वचन ॥ चित्त क्षीण झालें संततीविण ॥ परी आज आला सर्वार्थ घडोन ॥ तो श्रवणपुटें स्वीकारा ॥५७॥ एक अकस्मात माझ्या सदनीं ॥ बोवा आला कान फाडोनी ॥ कानफाडी केवळ तरणी ॥ मातें दिसूनि आला तो ॥५८॥ मग म्यां त्यासी स्तवोनी भक्तीं ॥ प्रसन्न केली चित्तभगवती ॥ मग प्रसाद वोपूनि माझे हातीं ॥ गमन करिता झाला तो ॥५९॥ तरी तो प्रसाद भस्मचिमुटी ॥ मातें दिधली पुत्रवृष्टी ॥ परी सांगोनि गेला स्वयें होटीं ॥ भक्षण करीं शयनांत ॥१६०॥ तरी माय वो सांगा नीती ॥ तेणें वाढेल काय संतती ॥ येरी ऐकोनि न मानिती ॥ तेणें काय होईल गे ॥६१॥ अगे ऐसीं सोंगें महीवरती ॥ कितीएक ठक बहु असती ॥ नाना कवटाळें करुनि दाविती ॥ जग भोंदिती जननीये ॥६२॥ आणि दुसरा त्यांत आहे अर्थ ॥ कानफाडे कवटाळे व्यक्त ॥ नानापरींच्या विद्या बहुत ॥ तयांपासी असती वो ॥६३॥ काय वो सांगूं शुभगात्री ॥ कानफाडे कृत्रिममंत्री ॥ जाया पाहोनि शुभगात्री ॥ करिती कुत्री मंत्रानें ॥६४॥ मग ते तयांते सवें घेऊनी ॥ हिंडती वस्ती क्षेत्रमेदिनी ॥ रात्रीमाजी कांता करोनी ॥ सुखशयनीं भोगिती ते ॥६५॥ तरी दिवसां कुत्री रात्रीं जाया ॥ करिती त्यांसी जाण माया ॥ तूं कोणीकडूनि भ्रमांत या ॥ पडली आहेस जननीये ॥६६॥ परी हें आम्हांसी दिसतें वोखट ॥ तूं शुभानन जाया अतिबरवंट ॥ पदरीं बांधोनि घेतलें कपट ॥ यांत बरवें दिसेना ॥६७॥ ऐसे बोल बोलतां युवती ॥ भवव्याघ्राची झाली वस्ती ॥ मग ती परम विटूनी चित्तीं ॥ सदनाप्रती आलीसे ॥६८॥ मग ती कवळोनि भस्मचिमुटीसी ॥ येती झाली गोठ्यापासीं ॥ तेथें गोरजकेरांसीं ॥ मिरवलीसे उकरडां ॥६९॥ तयामाजी भस्मचिमुटी ॥ सांडिती झाली ते गोरटी ॥ तयामाजी हरिजेठी ॥ संचार करी महाराज ॥१७०॥ जो नवनारायण कीर्तिध्वज ॥ प्रत्यक्ष विष्णु तेजःपुंज ॥ हरि ऐसे नाम साजे ॥ कीर्ति रत्नामाझारीं ॥७१॥ असो ऐसी अदैवराहटी ॥ करोनि जाती झाली गोरटी ॥ सदनीं येऊनि प्रपंचदिठीं ॥ सदा सर्वदा मिरवतसे ॥७२॥ असो ऐशी कथाअवसर ॥ पुढें निवेदूं ग्रंथ सादर ॥ तरी श्रोतीं क्षीरोदकसार ॥ पुढिले अध्यायीं स्वीकारणें ॥७३॥ भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ ॥ शुक्तिकानवरत्नमुक्त ॥ तुम्हां श्रोत्यांचे कर्णग्रीवेंत ॥ भूषणातें शृंगारुं हो ॥७४॥ यापरी निंदक खळ दुर्जन ॥ असो त्यांचें कांजीपान ॥ तयांचे निंद्य वचन ऐकोन ॥ सोडों नका क्षीरोदका ॥७५॥ धुंडीसुत मालूचें वचन ॥ नरहरि वदे जग सुगम ॥ भावार्थगुणीं गुंफोन ॥ माळ स्वीकारी श्रोत्यांसी ॥७६॥ स्वस्तिश्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वितीयोध्याय गोडा हा ॥१७७॥ अध्याय ॥२॥ ओंव्या ॥१७७॥ ॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ शुभं भवतु ॥

॥ नवनाथभक्तिसार द्वितीयोध्याय समाप्त ॥

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

4 × one =