श्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय ३५ वा पस्तीसावा ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे

ग्रंथ धार्मिक वारकरी ग्रंथ
Pocket

श्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय ३५ वा पस्तीसावा ओवीबद्ध मराठी

 

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ जयजयाजी करुणाकरा ॥ पंढरीशा रुक्मिणीवरा ॥ दीनबंधो दयासागरा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥ तूं दयाळ विश्वंभर ॥ बहुधा अर्थी हें चराचर ॥ भरण करिसी जन्म दिल्यावर ॥ कामनेतें लक्षुनी ॥२॥ तरी मम कामनेचा अर्थ ॥ कीं ग्रंथाक्षरें व्हावीं रसभरित ॥ तरी ग्रंथांतरी भराभर उदित ॥ विश्वंभरा होई कां ॥३॥ मागिले अध्यायीं उत्तम कथन ॥ रेवणनाथाचा झाला जन्म ॥ सहनसारुकें कृषिकर्म ॥ बोलूनियां दाविलें ॥४॥ दाविलें परी दैवें करुन ॥ अवचट देखिला अत्रिनंदन ॥ जो शंकरसेवक तयालागून ॥ तेंचि प्राप्त होतसे ॥५॥ हिरातेज गूढ स्थानालागुनि ॥ दडे तरी तया काढी हिरकणी ॥ भेटीलागीं येत धांवोनी ॥ लोहालागीं चुंबक ॥६॥ कां हंसपक्षी भक्षणांत ॥ कदा न भक्षी मुक्ताविरहित ॥ जरी गुंतला पिंजर्यां त ॥ परी तेंचि भक्ष्य भक्षीतसे ॥७॥ तेवीं रेवण योगमूर्ती ॥ मार्गीच भेटला अवचटगती ॥ दुग्धालागीं शर्करा निश्वितीं ॥ लवण कांहीं मिरवेना ॥८॥ असो ऐसा अवसर त्यांत ॥ घडला परी अबुद्धिवंत ॥ सिद्धिकळा घेऊनि चित्तांत ॥ अत्रिसुत दवडिला ॥९॥ दत्तें केलें शहाणपण ॥ किंचित कळा त्या दाखवून ॥ रक्षूनि आपुलें सकळ भूषण ॥ गेला निघूनि महाराजा ॥१०॥ जेवीं मर्कटा चणे देऊनि ॥ मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी ॥ तेवीं अत्रि आत्मज करणी ॥ करुनि गेला महाराजा ॥११॥ येरीकडे रेवणनाथ ॥ वृषभ ठेवूनि स्वशेतांत ॥ येऊनियां सिद्ध आउत ॥ करिता झाला महाराजा ॥१२॥ सकळ शेत झाल्यापाठीं ॥ नागदोर कवळूनि करसंपुटीं ॥ आउतमागीं फिरत जेठी ॥ गायनातें आरंभिलें ॥१३॥ आरंभिलें परी दत्तवचन ॥ मंत्रप्रयोगें गाय गायन ॥ दत्तमहिमा ऐसें म्हणून ॥ वृषमातें बोलतसे ॥१४॥ येरी महिमा ऐसें वचन ॥ सहज बोले प्रयोगानें ॥ परी महिमासिद्धि प्रत्यक्षपणें ॥ प्रगट झाली ते ठायीं ॥१५॥ सिद्धि येऊनि आउतापाशी ॥ म्हणे कामना कोण तुजसी ॥ येरु म्हणे तव नामासी ॥ श्रुत मातें करीं कां ॥१६॥ येरी म्हणे मी सिद्धि पूर्ण ॥ देहधारी महिमान ॥ ऐसें ऐकतां उत्तमोत्तम ॥ दत्तबोल आठवला ॥१७॥ जेव्हां सिद्धि दत्त देता ॥ ते सिद्धीची सकळ वार्ता ॥ सांगोनियां रेवणनाथा ॥ गेला होता महाराजा ॥१८॥ कीं हा प्रयोगितां मंत्र ॥ महिमा नामें सिद्धि पवित्र ॥ प्रत्यक्ष होईल तुजपुढें प्राप्त ॥ कामनेते पुरवावया ॥१९॥ मागणें जे आर्थिक कामना मनीं ॥ तूं तीस दाखवीं बोलूनी ॥ मग तितुके कार्यालागुनी ॥ सकळ कामना पुरवील ॥२०॥ म्हणसील काय आहे प्रताप तिचा ॥ तरी वदतां न ये आपुले वाचा ॥ सकळ भोग जो महीचा ॥ प्राप्त करील क्षणार्धे ॥२१॥ कानन तरु पाषाणपर ॥ जितुके असतील महीवर ॥ तितुके कल्पतरु साचार ॥ करुनि देईल क्षणार्धे ॥२२॥ आणि तुळवट जेथ पाषाण खाणी ॥ तपाची दावी अपार करणी ॥ की परीस तेवीं चिंतामणी ॥ करुनि दावी क्षणार्धें ॥२३॥ वसन भूषण धनकनकराशी ॥ अपार दावी नगाऐसी ॥ जें जें वर्तेल स्वकामनेसी ॥ तो तो अर्थ पुरवील बा ॥२४॥ ऐसें सांगूनि अत्रिआत्मजें ॥ ओपिलें होतें मंत्रबीज ॥ ऐसें श्रुत होतां सहजें ॥ दाटला होता गर्वानें ॥२५॥ परंतु निःस्पृह होता आनंदभरित ॥ हांकीत होता शेतांत आउत ॥ मंत्रप्रयोगीं विचारीत ॥ सहजस्थिति केलीसे ॥२६॥ परी महिमासिद्धि भेटतां त्यातें ॥ अधिक झाला आनंदभरित ॥ म्हणे सत्पंथ सांगोनि दत्त ॥ गेला असे महाराजा ॥२७॥ मग हातीचा सोडूनि आउतदोर ॥ तीतें बोलता होय उत्तर ॥ म्हणे शेतीं पैल असे तरुवर ॥ छायेकरुनि वेष्टिला ॥२८॥ तरी त्या शीतळ छायेतें ॥ कणाच्या राशी अपरिमित ॥ कनक करीं एक क्षणांत ॥ चमत्कार दावीं कां ॥२९॥ दृष्टीं पडतां कनकराशी ॥ मग मी म्हणेन सिद्धि तुजसी ॥ मग जे कामना होईल देहासी ॥ ते मी तुजला सांगेन ॥३०॥ तरी हे ऐसें परीक्षावचन ॥ आधीं दावीं मजकारण ॥ जैसा मोहोरा सूत गुंडोन ॥ अग्नि रक्षी परीक्षे ॥३१॥ कीं पक्षिकुळातें हंसदृष्टीं ॥ परीक्षे ओपी पयतोयवाटी ॥ कीं परिसा पारख पाषाणथाटीं ॥ लोह मिरवी कनकातें ॥३२॥ तेवीं आतां परीक्षापण ॥ दावी मिरवूनि अपार सुवर्ण ॥ तेणें मग संशयविरहित होवोन ॥ गोड होईल चित्तातें ॥३३॥ ऐसें बोलतां रेवणनाथ ॥ सिद्धि आश्चर्ये हास्य करीत ॥ म्हणे महाराजा एक क्षणांत ॥ कनकधनें भरीन सकळ मही ॥३४॥ मग सहज आणूनि कृपादृष्टीं ॥ विलोकीतसे महीपाठीं ॥ तों नगासमान कनकधनथाटी ॥ अपार राशी मिरवल्या ॥३५॥ तें पाहूनि रेवणनाथ ॥ म्हणे माते तूं आहेसी सत्य ॥ तरी आतां संन्निध मातें ॥ येथूनियां रक्षीं कां ॥३६॥ तूं सन्निध असतां सर्व काळ ॥ पुरविसी सकळ इच्छाफळ ॥ ऐसें बोलतां ती वेल्हाळ ॥ बोलती झाली तयातें ॥३७॥ म्हणे सन्निध राहीन आतां ॥ परी गुप्त वर्तेन जगाकरितां ॥ तुवां न धरावी दर्शनस्पृहता ॥ कार्य तुझें करीन मी ॥३८॥ मग अवश्य म्हणे रेवणनाथ ॥ कार्यसंबंधी असावें उदित ॥ मग कनकधनराशी गुप्त ॥ अदृश्य सिद्धि मिरवली ॥३९॥ त्यावरी सायंकाळपर्यत ॥ शेतीं प्रेरिलें समग्र आउत ॥ मग गुरांसवें येऊनि गोठंगणांत ॥ वृषभांतें बांधिलें ॥४०॥ रात्रीं करुनी शयनीं शयन ॥ तों उदय झाला द्वितीय दिन ॥ मग मनांत म्हणे ब्रह्मनंदन ॥ व्यर्थ कां कष्टें कष्टावें ॥४१॥ शेतीं सायंकाळपर्यंत ॥ संवत्सर हांकावें आउत ॥ तरी आतां कष्ट केउतें ॥ व्यर्थ शरीरा शिणवावें ॥४२॥ निधान असतां आपुले हातीं ॥ दैन्य भोगावें कवणें अर्थी ॥ परीस लाधला धनप्राप्ती ॥ मेळवूं कां जावें देशांतरा ॥४३॥ सुरसुरभी असतां घरीं ॥ तक्र मागावें घरोघरीं ॥ चिंतामणी ग्रीवेंमाझारी ॥ असतां चिंता कां भोगावी ॥४४॥ ऐशा कल्पना आणूनि चित्तीं ॥ सोडोनि दिधलें जाणें शेतीं ॥ तो दिन येत प्रहरमिती ॥ सहनसारु बोलतसे ॥४५॥ म्हणे वत्सा सोडूनि आउत ॥ गृहीं बैसलासी कवणे अर्थे ॥ येरू म्हने जाऊनि शेतांत ॥ काय ताता करावें ॥४६॥ कष्ट करितां रात्रंदिवस ॥ काय मिरवले फळास ॥ येरू म्हणे धान्य खावयास ॥ पिकवावें पाडसा ॥४७॥ शेत पिकलिया अपार कर्णी ॥ मग सुख भोगूनि अवनीं ॥ नातरी भ्रांति खावयालागुनी ॥ पुढे होईल बाळका ॥४८॥ ऐसें ऐकूनि तातवचन ॥ म्हणे कष्टें पिकवावें शेतीं अन्न ॥ तरी आपुले गृहीं काय न्यून ॥ म्हणोनि आतां कष्ट करावे ॥४९॥ येरु म्हणे बा आपुल्या गृहासी ॥ काय आहे न कळे मजसी ॥ नित्य स्थापूनि येरयेरा कोरड्यासी ॥ दिवसपरी लोटीतसें ॥५०॥ येरु म्हणे बोलसी खोटें ॥ सदन भरलेसें कनकवटें ॥ जाऊनि पहा खरे खोटे ॥ बोल माझे महाराजा ॥५१॥ तंव तो हांसूनि सहजस्थितीं ॥ गमन करीतसे धवळाराप्रती ॥ तों कनकराशी धन अपरिमिती ॥ गृहामाजी मिरवती ॥५२॥ तें पाहूनियां सहनसारुक ॥ चित्तीं आश्चर्य मानी दोंदिक ॥ म्हणे कैसे झालें कौतुक ॥ बाळबोलेकरुनियां ॥५३॥ मग परम होवोनि हर्षयुक्त ॥ म्हणे वरदपानी आहे सत्य ॥ कोणी अवतारी प्रतापवंत ॥ सिद्धमुनि हा असे ॥५४॥ मग तो सहनसारुक ऋषी ॥ कदा न सांगे कवण्या कार्यासी ॥ प्रमाण मानूनि त्याचे बोलासी ॥ तदनुसारें वर्तत ॥५५॥ मग तो रेवण ब्रह्मसुत ॥ काय करीतसे नित्यानित्य ॥ बुंधल ग्राम तो थोर अत्यंत ॥ मार्गावरी नांदतसे ॥५६॥ तैं पांथस्थ येतां मुक्कामासी ॥ पाचारुनि नेतसे सदनासी ॥ कामनेसमान आहारासी ॥ अन्न देतसे नित्यशा ॥५७॥ मग गांवात पडली एक हांक ॥ कीं रेवण देत अन्न उदक ॥ मग चुंगावर चुंगा लोक ॥ पांथिक सत्वर धांवती ॥५८॥ मग जैसी ज्याची इच्छा गहन ॥ तैसी पुरवी नाथ रेवण ॥ वस्त्रपात्र अपार धन ॥ देवोनियां बोळवी ॥५९॥ रोगभोगादि मनुष्यें येती ॥ तीं सर्व दुःखांची पावूनि शांती ॥ धन्य म्हणूनि गृहासीं जाती ॥ यशकीर्ति वर्णीत पैं ॥६०॥ मग जगांत होऊनि प्रसिद्ध ॥ सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध ॥ देशविदेशीं जनांचे वृंद ॥ रेवणसिद्ध म्हणताती ॥६१॥ तों कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ ॥ महीं करीत नानातीर्थ ॥ बुंधलग्रामीं अकस्मात ॥ मुक्कामातें पातला ॥६२॥ वस्तीसी धर्मशाळेंत राहून ॥ करीत बैसला श्रीगुरुचिंतन ॥ तों त्या गांवीचे कांहीं जण ॥ धर्मशाळेंत पातले ॥६३॥ येतांचि त्यांनीं देखिला नाथ ॥ म्हणती बाबा उतरलासी येथ ॥ तरी सारावया आपुला भक्त ॥ रेवणसिद्ध पहावा ॥६४॥येरु पुसे त्यांतें वचन ॥ रेवणसिद्ध आहे कोण ॥ मग ते सांगती मुळापासून ॥ कृषिकर्मी शोध हा ॥६५॥ ऐसे ऐकतां मच्छिंद्रनाथ ॥ जाऊनि पाहे अंतरीं गुप्त ॥ तो दृष्टी देखतां म्हणे चित्तांत ॥ अवतार असे हा एक ॥६६॥ आमुचा सांगाती पूर्णाश ॥ हा नारायण प्राज्ञ चमस ॥ तरी प्रसन्न कोण झाला यास ॥ शोध करुं तयाचा ॥६७॥ पुनः येवोनि धर्मशाळेंत ॥ लोकांसी म्हणे गुरु कोण यातें ॥ कोण मिरवला जगातें ॥ निजदेहाचें नाम सांगा ॥६८॥ तंव ते म्हणती बाबा नाथ ॥ आम्हां नाहीं माहीत ॥ मग स्तब्ध राहूनि मच्छिंद्रनाथ ॥ काय करी महाराजा ॥६९॥ पक्षिकुळांतें पाचारुन ॥ घालिता झाला इच्छाभोजन ॥ एका करीं बैसवोन ॥ तुष्ट करुनि बोळवी ॥७०॥ शिरीं स्कंधीं पक्षिमेळा ॥ मच्छिंद्र बैसोनि वेष्टी सकळां ॥ जाय म्हणतां उतावेळा ॥ अंबरातें जाती पैं ॥७१॥ मग पाचारुनि वनचरांसी ॥ त्यांसही देत आहारासी ॥ आपुले हस्तें व्याघ्रसिंहांसी ॥ ग्रास देत महाराजा ॥७२॥ ऐसे होतां कांहींएक दिवस ॥ लोक म्हणती महापुरुष ॥ हा ईश्वरचि म्हणूनि यास ॥ श्वापद विहंगम स्पर्शिती ॥७३॥ मग धन्य धन्य म्हणूनि ख्याती ॥ रेवणसिद्धासी सांगती ॥ म्हणती आला आहे एक जती ॥ सर्वापरी अदभुत ॥७४॥ विहंगमादि श्वापदगण ॥ सहज घेतसे पाचारुन ॥ तेही येती संशय सोडून ॥ भेटीलागी तयाच्या ॥७५॥ करीं स्कंधीं करुनि आरोहण ॥ अन्नोदकातें सेववून ॥ जा म्हणतां करिती गमन ॥ तृप्त मना मिरवोनि ॥७६॥ म्हणाल बोलणें व्यर्थ चावटी ॥ तरी आपण पहावें तया दृष्टी ॥ पक्षी श्वापदें कोट्यनुकोटी ॥ तयापाशीं येताती ॥७७॥ ऐसें ऐकूनि रेवणसिद्ध ॥ पाहूं चालिला प्रतापसिद्ध ॥ तों येतां देखिले पक्षियांचे वृंद ॥ करीं शिरीं मिरवले ॥७८॥ तें पाहूनि आश्चर्यवंत ॥ म्हणे वनचरीं कैसें सांडिलें द्वैत ॥ तरी फेडूं या संशयातें ॥ प्रत्यक्ष सिद्ध कोण हा ॥७९॥ मग शीघ्र येवोनि आपुले सदनीं ॥ जाऊनि बैसले एकांत स्थानीं ॥ दत्तमंत्र प्रयोगूनी ॥ प्रत्यक्ष करुं सिद्धीतें ॥८०॥ मग होतां प्रत्यक्ष सिद्धी ॥ म्हणे महाराजा विशाळबुद्धी ॥ कवण कामने काय सिद्धी ॥ प्रत्यक्ष केलें तुवां मातें ॥८१॥ येरु म्हणे वो कृपासरिते ॥ तुष्ट करिसी सर्व जनांतें ॥ तेचि रीतीं पक्षिकुळांतें ॥ तुष्ट करी श्वापदें कीं ॥८२॥ तुष्ट करिसी तरी कैसें ॥ हरुनि त्यांच्या देहबुद्धीस ॥ मम सन्निध स्वअंगास ॥ संगोपावें जननीये ॥८३॥ येरी ऐकोन वागुत्तर ॥ म्हणे महाराजा पक्षी आणि वनचर ॥ होणार नाहीत अद्वैतपर ॥ ब्रह्मवेत्त्यावांचोनी ॥८४॥ जो स्थावर आणि जंगमांत ॥ सर्वाचि नांदे हदयांत ॥ तयाचिया गोष्टी ह्या निश्चित ॥ जो अद्वैतपणें वसतसे ॥८५॥ हे महाराजा ऐक बोला ॥ जो जळरुपीच होऊनि ठेला ॥ तो जळामाजी मिळावयाला ॥ अशक्य काय उरेल जी ॥८६॥ तेवीं ब्रह्मपरायण होतां ॥ मग चराचरीं नुरे द्वैतवार्ता ॥ अद्वेष्टा झाला सर्वभूतां ॥ चराचरी महाराजा ॥८७॥ मग तो प्राणी सर्वभूत ॥ जगातें मानी आप्त ॥ आणि मग तेही मानिती त्यातें ॥ सखा सोइरा कीं आमुचा ॥८८॥ तरी आतां श्लाघ्यवंत ॥ आधीं व्हावें ब्रह्मव्यक्त ॥ त्यावरी बोले रेवणनाथ ॥ ब्रह्मवेत्ता करीं मातें ॥८९॥ येरी म्हणे चातुर्यखाणी ॥ अत्रिनंदन तुझा स्वामी ॥ त्यातें स्तवोनि उगमी ॥ साध्य करुनि घेई कां ॥९०॥ तुज तो साह्य झाल्या जाण ॥ मग पक्षिश्वापदीं अद्वैतपण ॥ काय असें तेवढें कठिण ॥ देवादिक येतील कीं ॥९१॥ स्वर्लोक भूलोक तपोलोक ॥ स्वर्गवासी सुरवर अनेक ॥ चरणसेवा दोंदिक ॥ वांछितील मग तुझी ॥९२॥ ऐसें सिद्धी बोलतां वचन ॥ चित्तीं म्हणे हेंचि करीन ॥ मग सर्व त्याग करुन ॥ काननांत प्रवेशे ॥९३॥ जयाठायीं भेटला दत्त ॥ तेथें जाऊनि बैसला नाथ ॥ दत्तस्मरणीं ठेवूनि चित्त ॥ वाट पाहे भेटीची ॥९४॥ मनीं दाटला भेटीचा योग ॥ तेणें अन्नोदकाचा झाला त्याग ॥ मग दिवसेंदिवस शरीरभोग ॥ शुष्ककाष्ठ दाहीतसे ॥९५॥ चालले तरुचें पर्णभक्षण ॥ येतसे काय जें उडून ॥ दत्तवियोगें भेटांकारणें ॥ काये वाचे वेला ॥९६॥ मग तें पाहून मच्छिंद्रनाथ ॥ म्हणें हा लागला प्रयत्नांत ॥ परी कोण गुरु आहे त्यातें ॥ समजला नाहीं अद्यापि ॥९७॥ अहा गुरु तो ऐसा कैसा ॥ काळरत्ना दृढोत्तर घालूनि फांसा ॥ गेला आहे अभ्यासमासा ॥ निष्ठुर मन करुनियां ॥९८॥ मग रेवणसिद्धाचा प्रताप ॥ पुसूनि घेतला जनमुखें माप ॥ ते म्हणती तो आहे जगबाप ॥ परोपकारी असे कीं ॥९९॥ कितीएकां घातलें इच्छि अन्न ॥ कितीएकां दिधलें अपार धन ॥ अपार जगाते अकिंचनपण ॥ अर्थाअर्थी हरीतसे ॥१००॥ ऐसी ऐकूनि जनाची गोष्टी ॥ चित्तीं म्हणे हा प्रतापकोटी ॥ सिद्धी सकळ साधला जेठी ॥ कोठेतरी गुरुकृपें ॥१॥ तरी आतां सिद्धि कोण ॥ झाली आहे या स्वाधीन ॥ त्या सिद्धीतें पाचारुन ॥ वृत्तांत श्रुत व्हावा कीं ॥२॥ मग अणिमा गरिमा लघिमा महिमा ॥ ईशित्व वशित्व प्राप्ति प्रकामा ॥ ऐशा अष्टसिद्धि नामा ॥ पाचारिल्या प्रत्यक्ष ॥३॥ प्रत्यक्ष होत त्या शुभाननी ॥ श्रीनाथाच्या लागल्या चरणीं ॥ नाथ म्हणे त्यातें पाहुनी ॥ उत्तर मज सांगावें ॥४॥ रेवणसिद्ध हा महापुरुष ॥ त्याचे सिद्धि दासत्वास ॥ कोणती सांगा आहे आम्हांस ॥ गुरुवाक्येंकरुनियां ॥५॥ तंव ती बोलती झाली महिमा ॥ मातें ओपिलें दास्यनेमा ॥ श्रीदत्तात्रेययोगद्रुमें ॥ मंत्रसिद्धिकरुनियां ॥६॥ मग दत्तात्रेय हा ऐकूनि गुरु ॥ म्हणे हा बंधूचि साचारु ॥ आहे तरी सर्वापारु ॥ हित इच्छिणें तयाचें ॥७॥ जैसा अर्धपिंडी भाग ॥ मारुतिदेहीं उद्भवला योग ॥ परी सीताहरणीं भोगिला भोग ॥ साह्य होऊनि तयासी ॥८॥ किंवा मागील संगेंकरुन ॥ गोपाळ झाले वानरगण ॥ सर्व साह्य होऊन ॥ माहात्म्यीं कृष्ण वाढविला ॥९॥ तेवीं आपुली ऐसी मती ॥ चमस नारायण स्वसंगतीं ॥ तरी या रेवणसिद्धाप्रती ॥ साह्य आपण व्हावें सर्वस्वीं ॥११०॥मग तेथूनि निघे अतिवेग ॥ गिरनारपर्वती आला चांग ॥ भेटूनि अत्रिआत्मजयोग ॥ रेवणसिद्धाचें वृत्त कथियेलें ॥११॥ सकालपणीं चरणी माथा ॥ ठेवूनि म्हणे अनाथनाथा ॥ हे गुरुराजा दयावंता ॥ साधकहिता भास्करु ॥१२॥ तरी अवनीं अवतारपूर्ण ॥ प्राप्तिक चमसनारायण ॥ तो तुम्हांकरितां क्लेश दारुण ॥ महीलागीं भोगीतसे ॥१३॥ निर्वाण धरुनि चित्तीं ॥ बैसला आहे काननाप्रती ॥ तरी कृपाबोध मारुतगती ॥ तयावरी सिंचावा ॥१४॥ अहा एक सिद्धी आणूनि त्या भास ॥ घालूनि गळां दृढोत्तर फांस ॥ तरी तो फांस झाला क्लेश ॥ मरणवाट त्या दावी ॥१५॥ जेथें झाली तुमची भेटी ॥ तेथेंचि बैसला काननपुटीं ॥ आहार त्यजूनि प्राण कंठीं ॥ आणूनियां ठेविला तो ॥१६॥ त्वचा झाली अस्थिव्यक्त ॥ देहींचें रुधिर आटलें समस्त ॥ प्राण कासावीस चक्षु श्वेत ॥ कार्पाससम दिसताती ॥१७॥ सरागींच्या शिरा दृश्या ॥ ढळढळीत दिसती महापुरुष ॥ पोटपाठ ऐक्यलेश ॥ हरिकटीसम मिरवत ॥१८॥ तरी महाराजा सदैव माउलें ॥ वत्सा करावे काय इतुलें ॥ अवकृपा करणें नव्हे भलें ॥ महीलागीं मिरवावें ॥१९॥ लोहाचे कनक करी परिस ॥ तेणें सांडिला पाकरस ॥ तरी परीस ऐसें कोण त्यास ॥ म्हणेल दगड मिरवेल ॥१२०॥ कीं एक तमाचा अरि पूर्ण ॥ तेणें साडिलें चांगुलपण ॥ मग सविताराज तया कोण ॥ महीलागीं बोलेल कीं ॥२१॥ आमुचा वरदपाणी ॥ स्पर्शिता जाय मौळीलागुनी ॥ मग तो सर्वालागूनि अवनीं ॥ ठेंगणेपणीं मानीतसे ॥२२॥ ऐसी चाल सहजस्थित ॥ गुरुची असे कृपा मूर्त ॥ तरी रेवणनाथदेहआहुत ॥ कष्टानळी न सांडावी ॥२३॥ पहा जीवनें केली लावणी ॥ सुखा आणिलें थोरपणीं ॥ ते शुष्क केलिया मोहेंकरुनी ॥ बुडवूं न शके जीवन तें ॥२४॥ त्याचि नीतीं पीयूषाभास ॥ सेविल्या ओपी संजीवनपणास ॥ तें पुढें कोपल्या मृत्युपदास ॥ पाठवील कीं महाराजा ॥२५॥ तरी त्या पीयूष रसाच्या गांवीं ॥ स्वप्नामाजी मृत्यु नाहीं ॥ तैसें तुमच्या हदयीं ॥ औदार्य बहु वसतसे ॥२६॥ ऐसे बोल त्या युक्तिवानाचे ॥ ऐकूनि दत्तहदयीं प्रेम नाचे ॥ डोलवूनि ग्रीवा साचें ॥ हास्य करी आनंदें ॥२७॥ मग तो उदार शांत दाता ॥ सवे घेऊनि मच्छिंद्रनाथा ॥ व्यान अस्त्र जल्पूनि चित्ता ॥ तया ठायीं पातले ॥२८॥ परी त्या उभय भव्यमूर्ती ॥ जैसे उतरले दोन गभस्ती ॥ कीं इंद्र वाचस्पती ॥ प्राज्ञिकपणीं मिरवले ॥२९॥ कीं एक हरि एक हर ॥ कीं द्रोण मंदराचल किमयागार ॥ प्रेममारुता होऊनी स्वार ॥ तया ठायीं पातले ॥१३०॥ तों येतांचि देखिला रेवणनाथ ॥ कृश शरीर काष्ठवत ॥ अस्थिमय प्राण व्यक्त ॥ वाट पाहे दत्ताची ॥३१॥ अतिक्लेशी कंठीं प्राण ॥ पाहूनि श्रमला अत्रिनंदन ॥ प्रेमें कवळिला सदयपणें ॥ माय जैसी बाळकातें ॥३२॥ कीं वत्सलागीं जैसी गाय ॥ हंबरडा फोडी अति मोहें ॥ तेवीं अत्रिनंदनें प्रेमहदयें ॥ प्रियभावें आलिंगिला ॥३३॥ तेणेंही चरणीं ठेवूनि माथा ॥ होय प्रेमाक्षु ढाळिता ॥ म्हणे आजी भेटली माझी माता ॥ निढळवाणी वत्सातें ॥३४॥ मग तो महाराज तपोराज ॥ हदयीं धरी अत्रिआत्मज ॥ मग साधकहिताचें चोज ॥ उल्हासें ओपीतसे ॥३५॥ जैसें सुतालागीं तात ॥ हिता ओपूनि परत्र होत ॥ तेवीं दूर्वाससहोदर मोहित ॥ होऊनि हिता मोहीतसे ॥३६॥ परम आराधूनि कृपें न्याहाळी ॥ कर्णी ओपिली मंत्रावळी ॥ तेणें तदघटी अज्ञानकाजळीं ॥ निघूनि गेली सर्वस्वीं ॥३७॥ मग तो ज्ञानी हदयीं दिवटा ॥ नृत्य करीतसे तत्त्वचोहटा ॥ तेणें करुनि द्वैतकांटा ॥ अंकुरातें खुडियेला ॥३८॥ मग कृपें आराधूनि वज्रशक्ती ॥ भाळीं चर्चिली दिव्य विभूती ॥ तेणेंकरुनि देहस्थिती ॥ शक्तिवान मिरवली ॥३९॥ मग सवें घेऊनि रेवणनाथ ॥ गिरनारपर्वती गेला दत्त ॥ तेथें बैसूनि दिवस अमित ॥ विद्यावसन नेसविलें ॥१४०॥ ब्रह्मज्ञानरसायन ॥ विपुलपणीं केलें पान ॥ तेणेंकरुनि ऐक्यपण ॥ चराचरीं मिरवलें ॥४१॥ ऐसा झाला तयातें आभास ॥ कीं मीच स्वामीचा भास ॥ मीच व्याप्त चराचरीं असें ॥ एकदेहीं मिरवलों ॥४२॥ मग पक्षिकुळा वनचरां सहित ॥ अचलपणी पापाणलता ॥ समीप येती पाचारितां ॥ रेवणनाथा वंदावया ॥४३॥ ऐशी अद्वैत दृष्टी होतां ॥ मग रसायणादि शीघ्र कविता ॥ वेदपाठी ज्योतिषअर्था ॥ प्रवीण कळा व्याकरणीं ॥४४॥ धनुर्धर जळतरणी ॥ वैद्य नाटकें चातुर्यगीत गायनी ॥ कोकशास्त्रादि अश्वारोहणी ॥ चतुर्दशविद्या निरोपिल्या ॥४५॥ उपरी नानाशास्त्रप्रवीण ॥ अस्त्रें सांगितलीं मच्छिंद्रासमान ॥ वज्रअस्त्रादि वाताकर्षण ॥ संजीवनी सांगितली ॥४६॥ वातास्त्र धूम्रास्त्र अग्निअस्त्र ॥ नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र ॥ जलदअस्त्रादि खगेंद्रास्त्र ॥ ब्रह्मास्त्रादि निरोपिलीं ॥४७॥ निर्वाण रुदास्त्र वासवशक्ती ॥ देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्रगती ॥ असो ऐसे वर्णितां किती ॥ अपार अस्त्रीं मिरविला ॥४८॥ मग नाथपंथीं दीक्षा देऊन ॥ उन्मनी मुद्रा फाडिले कान ॥ तत्त्वामाजीं दिव्यज्ञान ॥ गळां कंथा ओपिली ॥४९॥ देवविती शुद्ध सारंगी ॥ अनुहत वाजे नाना अंगीं ॥ कुबडी फावडी देहप्रसंगीं ॥ देह विदेही मिरवला ॥१५०॥ ऐसा होऊनि पूर्ण स्थित ॥ मग सवें घेऊनि मच्छिंद्रनाथ ॥ मार्तडपर्वतीं गेले त्वरित ॥ नागेश्वरस्थाना वंदिलें ॥५१॥ तेथें करुनि देवदर्शन ॥ वरद घेतला विद्येकारणें ॥ मग साबरीविद्या कवित्वरचन ॥ महीवर मिरवीतसे ॥५२॥ असो सर्व साध्य झाल्यावरी ॥ मावदे मांडिले बहुतां गजरीं ॥ हरिहरादि साह्यकारी ॥ गिरिनारपर्वतीं आणिलें ॥५३॥ सुवर्लोक भूलोक तपोलोक ॥ स्वर्गवासी पुण्यश्लोक ॥ गणगंधर्व सुरवर अनेक ॥ मावद्यास आणिले ॥५४॥ ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनीकुमार चंद्र भास्कर ॥ सकळ समुच्चय पर्वताकार ॥ मावद्याते पातले ॥५५॥ चार दिवस यथायुक्त ॥ सोहळा भोगिला अपरिमित ॥ मग प्रसन्न होऊनि सकळ दैवतें ॥ पूर्ण वरा ओपिलें ॥५६॥ वर देऊनि सकळ विद्येसी ॥ जात झाले स्वस्थानासी ॥ रेवणासिद्धही तीर्थाटनासी ॥ अत्रिआत्मजें पाठविला ॥५७॥ तीर्थे हिंडतां अपार महीसी ॥ तों विठग्राम मानदेशीं ॥ तेथें येऊनि मुक्कामासीं ॥ सहजस्थितीं राहिला ॥५८॥ तों तेथें सरस्वती ब्राह्मण ॥ जान्हविका स्त्री तयालागून ॥ लावण्यलतिक स्वरुपवान ॥ चंद्रासी वदनें लाजवितसे ॥५९॥ उभय स्त्रीपुरुष एकचित्ती ॥ जेवीं ते लोहचुंबकरीती ॥ किंवा जगप्रिय गमस्ती ॥ अवियोगप्रीतीं वाहिले ॥१६०॥ कीं मीनतोयाची संगती ॥ कीं विवरस्थाची एकनीती ॥ कीं भावाअंगी सिद्धभक्ती ॥ सदा धवळारीं नांदतसे ॥६१॥ तन्न्याये उभयतां जाण ॥ प्रपंच वहिवाटिता एकप्रमाण ॥ परी इतुकें असोनि जठरीं संतान ॥ शून्यपणें मिरवत ॥६२॥ सप्त पुत्र झाले तयासी ॥ परी ते बाळपणीं पंचत्व देहासी ॥ सातवें आठवे दिवशीं ॥ दहावे दिवशीं पंचत्व होय ॥६३॥ असो षटपुत्र देहान्त पावले ॥ यावरी सातवे उदय पावले ॥ ते द्वादश दिन वांचलें ॥ तेणें हर्षलें विप्रमन ॥६४॥ कांतेती म्हणे परम वेल्हाळे ॥ पंचम षष्ठ भक्षिले काळे ॥ हें द्वादश दिन वांचले केवळ ॥ काळवेळ लोटली येणें ॥६५॥ एक आणि चुकल्यापरीस ॥ तों दश वर्षांचा होय आयुषी ॥ तरी आतां या पुत्रासी ॥ भय नसे सर्वथा गे ॥६६॥ ऐसें कांतेसी बोलून वचन ॥ बारसें मांडिलें परम आवडीनें ॥ गृहीं करुन पंचपक्कान्नें ॥ घाली भोजन विप्रांसी ॥६७॥ तों ते दिवशीं रेवणनाथ ॥ भिक्षा करीत आला तेथ ॥ अलक्ष गाजवूनि त्या द्वारातें ॥ पुढे पाऊल ठेवीतसे ॥६८॥ तंव त्या विप्रें देखिलें दुरोनी ॥ वाढतें पात्र ठेविलें धरणीं ॥ तैसाचि बाहेर येऊनी ॥ नाथानिकट लगबगें ॥६९॥ तंव तेजःपुंज हाटककांती ॥ देखतां विप्र म्हणे चित्तीं ॥ हा पूर्व तापसी अवतार क्षितीं ॥ कोणी तरी आहे कीं ॥१७०॥ तैसाचि सोहळा लगबगेंकरुन ॥ नाथचरणीं मस्तक ठेवोन ॥ म्हणे महाराजा प्रयोजन ॥ माझे घरीं आहे कीं ॥७१॥ ऐसें असोनि मज दरिद्रियाचे मनोरथ ॥ डावलूनि जातां किमर्थ ॥ तरी हे तुम्हां नव्हे यथार्थ ॥ अनाथा सनाथ करावें ॥७२॥ मी हीन दीन जाति ब्राह्मण ॥ काय करावा उत्तम वर्ण ॥ सेवाचोर अतिथिकारणें ॥ व्यर्थ संसारीं मिरवतों ॥७३॥ ऐसें बोलोनि म्लान वाणी ॥ माथां वारंवार ठेवी चरणीं ॥ आपुला वर्णाश्रम टाकोनि ॥ विव्हळ झाला भावार्थे ॥७४॥ त्यावरी नाथ बोले त्यासी ॥ आम्ही शूद्र तूं विप्र मिरविसी ॥ मज नमस्कारावया तुजसी ॥ अर्थ नाहीं जाणिजे ॥७५॥ येरु ऐकूनि बोले वचन ॥ शूद्र जातीचा ब्राह्मण ॥ तो मातंगा करील नमन ॥ अन्य वर्ण चुकेल कैसा ॥७६॥ कडू भक्षिता काय होय गोड ॥ होणार नाहीं धडफुढा ॥ प्राज्ञिक मानिला जेणें वेडा ॥ तरी त्या पंडिता धिक्कार ॥७७॥ तरी ऐसें वर्म निपुण ॥ मज कैसे येईल घडून ॥ परी देखावें श्रेष्ठ वचन ॥ ऐसी विनंती करीतसे ॥७८॥ ऐसें बोलतां विप्र त्यातें ॥ मनांत म्हणे रेवणनाथ ॥ हा विप्र आहे प्रज्ञावंत ॥ बोलापरी चालतसे ॥७९॥ नातरी बोल बोलतां सोपे ॥ आचार दावितां टीर कांपे ॥ तरी आतां असो यातें स्वल्प ॥ सिद्धार्थातें मेळवंच ॥१८०॥ मग विप्राचा धरुनि हात ॥ संचार करी त्याचे गृहांत ॥ विप्रें नेवोनि स्वसदनांत ॥ महाराज बैसविला ॥८१॥ पात्र लगबगें आणी वाढून ॥ सर्व पदार्थ भरी प्रेमेंकरुन ॥ पात्रानिकट बैसोन ॥ भोजन सारी नाथाचें ॥८२॥ अन्य विप्रां विप्र नेमून ॥ सकळाचें करी संगोपन ॥ परी आपण न उठे नाथापासून ॥ परमभक्तीसी गुंतला ॥८३॥ जैसी शर्करेसी पिपीलिका ॥ काढूं जातां दडपी मुखा ॥ तेवीं भक्तीचा धरुनि आवांका ॥ विप्र गुंतला नाथभक्ती ॥८४॥ असो ऐसे परम भक्तीं ॥ नाथाची झाली जठरतृप्ती ॥ येरीकडे विप्रपंगती ॥ गेले भोजन सारुनियां ॥८५॥ विप्र गेले आपुले सदनीं ॥ येरीकडे नाथालागूनी ॥ भोजन झाल्या नम्र वचनीं ॥ बोलता झाला विप्र तो ॥८६॥ म्हणे महाराजा आजिचा दिन ॥ वस्तीसी सेवावें माझें सदन ॥ उदयिक प्रातःकाळीं उठून ॥ जाणें असेल तरी जावें ॥८७॥ पाहूनि तयाचा परम आदर ॥ अवश्य म्हणे विधिकुमर ॥ एकांतस्थानीं शयनावर ॥ नाथा नेऊनि पहुडविलें ॥८८॥ नाथ शयनीं होतां निद्रित ॥ आपण भोजन सारुनि त्वरित ॥ वारासार करुनि येत ॥ नाथापाशीं त्वरेनें ॥८९॥ तों सूर्य गेला अस्तासी ॥ मग उठूनि बैसला तापसी ॥ पुन्हा वंदूनि नाथचरणांसी ॥ उपाहार करवा म्हणतसे ॥१९०॥ तंव नाथ म्हणे आतां भोजन ॥ झालें आहे न इच्छी मन ॥ मग आपुला नित्यनेम सारुन ॥ पुन्हां शयनीं पहुडला ॥९१॥ सरस्वती ब्राह्मण निकट बैसून ॥ नाथाचे चुरीतसे चरण ॥ तों मध्यरात्री झाली पूर्ण ॥ तेव्हां विपर्यास वर्तला ॥९२॥ बाळ जें होतें मातेपाशीं ॥ सटवीनें झडपिलें त्यासी ॥ परम तें झालें कासाविशी ॥ शोकसिंधु उचंबळला ॥९३॥ हांक मारी स्वभर्त्यातें ॥ म्हणे बाळ कासाविसी बहु होतें ॥ विप्र म्हणे त्या कांतेतें ॥ होईल तैसें होऊं दे ॥९४॥ तूं न करीं आतां कांही अनुमान ॥ निद्राभंग होईल नाथाकारण ॥ आपुलें प्रारब्ध मुळींच हीन ॥ बरवें कैसें होईल गे ॥९५॥ मागें आचरलों कांहीं पाप ॥ तें भोगितों अमूप ॥ आतांहि मोडितां स्वामीची झोंप ॥ सुलभ पुढें दिसेना ॥९६॥ ऐसें बोलूनि कांतेतें ॥ श्रीनाथाचे चरण चुरीत ॥ तों सवितासुताचे येऊनि दूत ॥ बाळ पाशीं आकर्षिला ॥९७॥ काढूनि चैतन्य जीवदशारुप ॥ घेऊनि गेले यमासमीप ॥ येरीकडे शवस्वरुप ॥ बाळदेहीं मिरवलें ॥९८॥ मग तो मायेचा मोह दारुण ॥ हदयीं पेटला विरहअग्न ॥ मग मंद रुदन भरतां नयन ॥ जान्हवी तेव्हां करीतसे ॥९९॥ तों प्रातःकाळसमय झाला ॥ शयनीं नाथ जागृत झाला ॥ तों मंद रुदनार्थ आकर्णिला ॥ एकाएकीं तयानें ॥२००॥ नाथें ऐकूनि मंद रुदन ॥ विप्रासी म्हणे रडतें कोण ॥ येरु म्हणे बाळकाचा प्राण कासावीस होतसे ॥१॥ म्हणोनि मोहस्थित नाथा ॥ अज्ञानपणीं रडतें कांता ॥ ऐसी ऐकूनि तयाची वार्ता ॥ बाळा आणीं म्हणतसे ॥२॥ मग तो विप्र स्वकांतेपाशीं ॥ येऊनि पाहे स्वपुत्राची ॥ तंव तें मिरवलें प्रेतदशेसी ॥ हांका मारुनि तेधवां ॥३॥ म्हणे महाराजा प्राणरहित ॥ बाळ झालें निश्चित ॥ ऐसें ऐकूनि रेवणनाथ ॥ परम चित्तीं क्षोभला ॥४॥ म्हणे मी या स्थळीं असतां ॥ कैसा डाव लाधला कृतांता ॥ तरी तो कृतांत पाहीन आतां ॥ पाहूनि नाहींसा करीन मी ॥५॥ ऐसे दुर्घट शब्द वदोन ॥ ब्राह्मणासी म्हने बाळ आण ॥ तंव तें शरीर उचलोन ॥ नाथालागीं अर्पीतसे ॥६॥तंव तें बाळ परम गोमटें ॥ नाथ पाहे आपुले दृष्टीं ॥ चित्तीं हळहळूनि म्हणे नष्ट ॥ कर्म काय उदेलें ॥७॥ विप्रासी म्हणे बाळ तूतें ॥ इतुकेचि झाले काय नितांत ॥ येरी म्हणे कृपावंत ॥ बाळ सातवें हें असे ॥८॥ बाळ होतां बाळंतपर्णी ॥ मृत्यु पावले पंचसप्तादिनी ॥ द्वादशदिन तपः प्राज्ञी ॥ बाळ सातवें हें असे ॥९॥ तरी आतां असो कैसें ॥ हीन प्रारब्ध आहे आम्हांस ॥ तें सुफळपणीं कर्मलेश ॥ फळा कैसें येईल कीं ॥२१०॥ परी असो होणार तें झाले ॥ आमुचे सेवेसी चित्त रंगलें ॥ तें पुण्यांश हेंचि इतुलें ॥ वारंवार लाधो कीं ॥११॥ ऐसी बोलतां विप्रहाणी ॥ अंतर जाणितलें प्रांजळपणीं ॥ मग सरस्वतीविप्रा पाचारुनी ॥ बोलता झाला महाराजा ॥१२॥ म्हणे वत्सा तीन दिवस ॥ जतन करीं बाळतनूस ॥ मी स्वतः जाऊनि यमपुरी ॥ साती बाळें आणितों कीं ॥१३॥ मग अमरमंत्र मंत्रूनि विभूती ॥ चर्चिली बाळशवाप्रती ॥ म्हणे विप्रा बाळ हें क्षितीं ॥ येणें नासणार नाहीं रे ॥१४॥ ऐसें सांगूनि त्वरितात्वरित ॥ तेथूनि निघता झाला नाथ ॥ व्यानअस्त्र जल्पूनि सनाथ ॥ अतिवेगेंसीं चालिला ॥१५॥ भोंवतें अस्त्रांचें करी भ्रमण ॥ तेणें हिमालयाचे अंबुकण ॥ शीतळ करुनियां जाण ॥ यथास्थित मिरवले ॥१६॥ जैसे शीताचे झुळकेआंत ॥ समीप पावक निश्वित ॥ तेणेंकरुनि शरीरांत ॥ बाधा न करी अंगातें ॥१७॥ तेवीं आदिनामास्त्र ॥ सव्य मेळवूनि योगपात्र ॥ व्यानास्त्र मुखीं स्तोत्र ॥ जल्पूनि गिरि वेधला ॥१८॥ सहज चालिला यमपुरीं ॥ संचर करी यक्षधवळारीं ॥ तो धर्मराज पाहूनि नेत्रीं ॥ आसनाहूनि उठालासे ॥१९॥ बैसवूनि आपुले कनकासनीं ॥ षोडशोपचारें पूजिला मुनी ॥ सहज करपुटीं नम्र वाणी ॥ धर्मराजें आरांधिला ॥२२०॥ म्हणे महाराजा योगदक्ष ॥ किमर्थ कामीं योजिला पक्ष ॥ तरी तें वदूनि सुढाळ पक्ष ॥ मज यक्षातें तुष्टवीं ॥२१॥ येरु म्हणे यमपुरनाथा ॥ मी सरस्वतीविप्राचे घरीं असतां ॥ तुवां येऊनि तयाच्या सुता ॥ हरण केलें कैसें रे ॥२२॥ तरी जें घडूं नये तें घडलें ॥ परी आतां मागुती देइजे वहिलें ॥ आणि षटपुत्र त्याचे कोठें ठेविले ॥ तेही आतां देई आणोनी ॥२३॥ तरी या बोलासी वर्तन ॥ तूतें न ये जरी घडून ॥ मग मम कोपाचा प्रळयाग्न ॥ उरों न देई तुजलांगीं ॥२४॥ ऐसें बोलतां रेवणनाथ ॥ विचार करी तेजोब्धिसुत ॥ म्हणे चांगलें बोलूनि यातें ॥ शिवधरेतें धाडावा ॥२५॥ आपुल्या सर्वस्वीं निमित्याकडून ॥ अधिकारी करावा उमारमण ॥ हा सिद्ध तेथें गेल्यानें ॥ दृष्टीं पडेल प्रतापू ॥२६॥ ऐसा विचार करुनि मानसीं ॥ बोलता झाला योगियासी ॥ म्हणे महाराजा मम बोलासी ॥ चित्त द्यावें यथार्थ ॥२७॥ हे महाराजा हरिहर ॥ आणि तिजा तो नाभिकुमर ॥ हे मुख्य यांचा कारभार ॥ सकळ करणें तयांचें ॥२८॥ जरी म्हणाल कैसे रीतीं ॥ त्रिवर्ग त्रिकामीं असती ॥ शिव क्षयी विधि उत्पत्तीं ॥ रक्षणशक्ति विष्णूचि ॥२९॥ तरी यक्षपति तो तमोगुणविहारी ॥ आम्ही त्याची करितों चाकरी ॥ मारणें तारणें आमुच्या करीं ॥ कांहीं एक नसे जी ॥२३०॥ तरी आतां प्रतापराशी ॥ गमन करावें कैलासासी ॥ आराधूनि शिवचित्तासी ॥ सप्तपुत्र न्यावे जी ॥३१॥ आणीक खूण सांगतों उत्तर ॥ तेथेंचि आहेत सप्तकुमर ॥ तरी दावूनि आपुला बुद्धिसंचार ॥ कार्य आपुलें करणें जी ॥३२॥मजवरी जरी आलां आपण कोपोन ॥ तरी मी काय हीनदीन ॥ क्षयकर्ता उमारमण ॥ प्रसिद्धपणीं मिरवतसे ॥३३॥ क्षयकर्ता आहे भव चराचरीं ॥ शास्त्रादि बोलती साचार ॥ आपणही आहांत जाणिव सर्व ॥ अंतरंग सर्वाचें ॥३४॥ ऐसें असोनि महाराज ॥ कां कोपानळी योजितां मज ॥ सोज्ज्वळतेजीं अर्कराज ॥ तमधवळारा नांदवितां ॥३५॥ तुम्ही सर्वांचे ज्ञानदिवटे ॥ कूपीं पडतां अज्ञानवाटे ॥ हें योग्य नव्हे तुम्हां हळवटे ॥ धोपटपंथीं मिळाना कां ॥३६॥ ऐसें बोलतां धर्मराज ॥ मान तुकावी तेजःपुंज ॥ म्हणे हें पंचाननाचे काज ॥ तें सत्यार्थ बोलसी तूं ॥३७॥ तरी आतां कैलासीं जाईन ॥ कैसा आहे पंचानन ॥ तो सर्व दृष्टीं पाहीन ॥ अमित्रपन त्यासुद्धां ॥३८॥ ऐसें बोलूनि योगधारणी ॥ उठता झाला मग तेथुनी ॥ व्यानअस्त्र मुखीं स्तवोनी ॥ कैलासातें पातला ॥३९॥ आतां तेथें कथासार ॥ होईल तितुकी धुंडीकुमर ॥ मूळ काव्य ग्रंथापर ॥ नरहरिकृपें वर्णीत ॥२४०॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ पंचत्रिंशाध्याय गोड हा ॥२४१॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥ शुभं भवतु ॥

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

17 + eleven =