तुळस अध्यात्म विज्ञान उपयोग

धार्मिक
Pocket

धनंजय महाराज मोरे

आरोग्यदायी तुळस

तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे शरीरात प्रवेश केल्यावर तुळस लगेच कामाला लागते.
बाग असो किंवा छोटीशी बाल्कनी असो, तुळशीचे झाड नाही, असे घर भारतात शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक घरात तुळस मुलीच्या हक्काने राहते आणि घरामध्ये दर वर्षी विवाह प्रसंग तिच्यामुळेच होऊ शकतो. तुळशीला इतके अनन्यसाधारण महत्त्व का आहे, याचे उत्तर पुराणात, आयुर्वेदात व आरोग्यशास्त्रात सापडते.
१) अध्यात्मिक महत्व- 
याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदरनावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच * शालिग्राम’ म्हणतात.
ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जातेतिला वृंदावनअसे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून शालिग्रामहा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.
२) वैज्ञानीक महत्व- 
जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन- O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड- CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डायऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन- O3 वा़यु सोडते. व या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn- सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते.आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगीतले आहे.
तुळशीच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. रामतुळशी व कृष्णतुळशी हे दोन प्रकार सर्वांच्या परिचयाचे असतीलच, पण पास्ता, पिझ्झा वगैरे खाद्यपदार्थांवर बेसिल म्हणून वापरली जाणारी पानेसुद्धा एका प्रकारच्या तुळशीचीच असतात. कापरासारखा वास असणारी तुळशी कर्पूरतुळशी म्हणून ओळखली जाते. याशिवाय लिंबासारखा वास असणारीही एक जात असते. सर्व प्रकारच्या तुळशींना एक प्रकारचा विशिष्ट गंध असतो. त्यामुळे सुगंधी तेल काढण्यासाठीही तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
तुळशीचे उपयोग
तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणाच्या योगे तुळस अनेक कार्ये करते; मात्र तुळशीमधला सर्वांत उपयुक्‍त गुण म्हणजे सूक्ष्म. या गुणामुळे ती शरीरात प्रवेशित झाली की लगेच कामाला लागते. शरीरातील लहानातील लहान पोकळीत पोचू शकते. यामुळे आत्यंतिक अवस्था (इमर्जन्सी) असली, की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो.
थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.
लघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन (अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम) करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता, वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो.
तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळस उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे काम होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते.
शरीरात कुठेही जडपणा, जखडलेपण जाणवत असेल तर त्यावर तुळस उपयोगी पडते. डोके जड होऊन दुखत असेल, कफ भरून राहिला असेल, तर डोक्‍यावर पानांचा शेक करण्याचा फायदा होतो. सायनसमध्ये कफ भरला असेल, जडपणा जाणवत असेल तर बाहेरून तुळशीच्या पानांनी शेक करण्याने लगेच बरे वाटते.
पचनसंस्थेमध्ये कफदोष वाढल्यामुळे पोट जड होणे, सुस्ती वाटणे, तोंडाला चव नसणे वगैरे लक्षणे जाणवतात, अशा वेळी तुळशीची पाने व आले यांचा चवीपुरती साखर टाकून बनवलेला चहा घोट घोट पिण्याने बरे वाटते.
पर्यावरणशुद्धीसाठी तुळस
                              तुळशीची कार्ये चरकसंहितेमध्ये पुढीलप्रमाणे समजावलेली आहेत

                             हिक्का कासविषश्‍वास-पार्श्‍वशूलनिनाशनः । 
                              पित्तकृत्‌ कफवातघ्नः सुरसः पूतिगन्धहा ।। चरक सूत्रस्थान 

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्‍त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीच्या आसपास रोगसंक्रामक जीवजंतूंचे प्रमाण निश्‍चित कमी असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढते, जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. तुळशीची पाने, मंजिऱ्या वाळवून त्याचा धूप करण्याने तुळशीच्या जंतुघ्न गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते.
तुळशीच्या पानांचा रस काढण्याची पद्धत – साधारण चमचाभर रस हवा असला तर 10-15 पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत व सुती कापडाने पाणी टिपून कोरडी करावीत. खलबत्त्यामध्ये पाने टाकून त्यांची चटणी होईपर्यंत नीट कुटावीत. स्वच्छ सुती कापडावर ही कुटलेली चटणी ठेवून त्याची पुरचुंडी करून पिळावी व तुळशीच्या रसाचे थेंब गोळा करावेत. रस काढल्यावर तो शक्‍य तितक्‍या लवकर वापरणे चांगले. रस शिळा झाला तर त्यातील औषधी गुणधर्म कमी होऊ शकतात. सुती कापडातून पिळून रस काढताना कापडालाच बराचसा रस लागून वाया जाऊ शकतो, त्यामुळे थोडासा रस काढायचा असल्यास कुटलेला गोळा डाव्या हाताच्या तळव्याच्या मध्यावर ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याने दाबून रस काढता येतो. तुळशीचा रस मधाबरोबर किंवा साखरेबरोबर घेतला जातो. मधामुळे तुळशीतील कफसंतुलनाचा गुण अधिक वाढतो, तर साखरेमुळे उष्णता, तीक्ष्णता कमी होण्यास मदत मिळते.
तुळशीच्या पानांपासून बनविलेला चहा – एक कप चहा बनविण्यासाठी कपभर पाणी घ्यावे, त्यात तुळशीची चार-पाच पाने टाकावीत, किसलेले आले पाव चमचा घालावे, चवीनुसार साखर टाकावी, एक मिनिट उकळल्यावर वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावा.
तुळशीच्या बियांचा फालुदा – तुळशीच्या बिया पित्तशामक म्हणजे उष्णता कमी करणाऱ्या, लघवी साफ होण्यास मदत करणाऱ्या व पौष्टिक असतात. या बिया पाण्यात 25-30 मिनिटे भिजवून ठेवल्या तर फुलतात व गुळगुळीत बनतात. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा शरद ऋतूत तसेच पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी तुळशीच्या बिया दुधाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर घेणे उत्तम असते.
तुळशीचे बाह्य उपयोग
त्वचारोगात, विशेषतः खाज येणाऱ्या त्वचारोगात तुळशीच्या पानांचा रस लावण्याचा उपयोग होतो.
तुळशीची पाने वाफवून त्यांचा छातीवर लेप केल्यास कफयुक्‍त खोकला कमी होतो.
विंचू चावला असता दंशस्थानी तुळशीचा रस लावणे चांगले असते.
टॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप करण्याने बरे वाटते.
सायनस, सर्दी, डोके जड होणे वगैरे तक्रारींवर तुळशीच्या पानांचा वाफारा घेण्याचा फायदा होतो.
तुळशीच्या सान्निध्यात सकाळ-संध्याकाळ काही वेळ बसण्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होण्यास मदत मिळते.
तुळशीच्या बियांना तकमारिया असेही म्हटले जाते. चमचाभर तुळशीच्या बिया थोड्याशा पाण्यात भिजत घालाव्यात. साधारण तीस मिनिटांनी फुलतात. कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या दुधात चमचाभर साखर किंवा शतावरी कल्प, आवडत असल्यास अर्धा चमचा रोझ सिरप, भिजवलेल्या तुळशीच्या बिया टाकून एकत्र करून नीट हलवून प्यावे.
तुळशीचे सिरप – तुळशीच्या पानांचा रस काढावा. रसाच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. पाण्याचा अंश उडून गेला की सिरप तयार झाले असे समजून भरून ठेवावे. लहान मुलांना देण्यासाठी तसेच बारा महिने तुळशी उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी हे सिरप उत्तम होय.
दमा, खोकला, घशामध्ये सतत कफाचा चिकटपणा जाणवणे, तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, जंत होणे वगैरे त्रासांमध्ये हे सिरप अर्धा ते एक चमचा इतक्‍या प्रमाणात घेता येते.

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

4 + 15 =