वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संक्षिप्त जीवन चरित्र

वारकरी संत
Pocket

*🌺 वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 🌺*
🌹 संक्षिप्त जीवन दर्शन 🌹
_*अमरावती निकटची यावली ही वं.राष्ट्रसंतांची चिमुकली जन्मभूमी. श्री बंडोजी अर्थात नामदेव गणेशपंत इंगळे-ठाकुर ब्रह्मभट्ट हे त्याचे तीर्थरूप.माता मंजुळादेवी ही वरखेडच्या तुकारामबुवा वानखेडेची कन्या. स्वाभिमानी पिता शिवनकाम करी नि भक्तिमती माता दळणकांडण करी. गुरुकृपेनं या अशिक्षित दांपत्याचे चंद्रमोळी झोपडीत दि ३०.४.१९०९ रोजी या एकुलत्या सुपुत्राचा जन्म प्रचंड वादळात झाला.अकोटचे ब्रह्मनिष्ठ हरिबुवा नि माधानचे अलौकिक संत श्री गुलाबराव महाराज यांनी स्वतः नामकरणविधी संपन्न केला. ‘माणिकदेव ‘ या जन्मनावाऐवजी गुरुदत्त ‘तुकडया ‘ नावच प्रचारात आल. शाळेत घातल तरी ‘शाळा कोण करी। जावे नदीचिया तीरी ‘ असा प्रकार, पण परिक्षेत माञ पास ! ध्यान,कविता-कीर्तन हा त्यांचा बालछंद ! पोहणं, अ२वारोहण, कुस्त्या ईत्यादी नवनवीन कला ते आत्मसात करी. आदिवासी समाजात ‘देवबाबा ‘ म्हणून त्यांनी कर्मज्योत पेटवली. नेरीच्या फकीरांना मंत्रतंत्रादि साधनाचा फोलपणा पटविला. भाबडया लोकांनी त्याना विष दिल.पण त्यांनी माञ जगाला ‘आनंदामृत ‘दिलं .ह्याच वेळी चिमूरला ‘माणिक प्रसादिक बालसमाज’ जन्मासं आला. प्रथम १९२९ साली पहिली हिंदी भजनावली प्रसिद्ध केली. १९३३ चा चिमूरचा प्रथम चातुर्मास व त्यांचे क्रांतिप्रवण कार्य चुणूक दाखविणारा ठरला. १९३५ चा सालबर्डीचा महायज्ञ तर ‘न भूतो म भविष्यति ‘ असा झाला अंधश्रद्धा निर्मूलन व जाति भेदा च्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावी माध्यमाचा वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.*_

_*तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर  जपान सारख्या  देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या  स्वातंत्र्यसंग्रामात ‘ झाडझडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पथ्थर सारे बाँम बनेंगे, नाव लगेगी किनारे ‘ याच प्रात्याक्षिक चिमुर-आष्टीला तर कमालीचं दिसलं ! याच संदर्भात आंग्लसत्तेन महाराजांना नागपूर, रायपूर तुरुगांत डांबल नि नंतर सुध्दा चंद्रपूर, वर्धा जिल्हयात प्रवेशबंदी केली ! हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. सर्वागीण मानवधर्माची शिकवण स्थायी करण्यासाठीच याच १९४३ मध्ये ‘श्रीगुरुदेव ‘ मासिक सुरु केलं. १९४६ ला वरखेडच्या मंदिरापासून मंदिर प्रवेशाची लाट उठविली.१९४७ ला लाभलेल्या स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्याच्या संदेशाबरोबरच सेवासप्ताह, ग्रामस्वच्छतासप्ताह, स्वावलंबसप्ताह, राष्ट्रीय एकात्मता-सप्ताह, श्रमदानयज्ञ, ग्रामनिर्माणपर्व,कोयणा-भूकंपातील मदत कार्य, १९५५ ला जपानचं निमञण स्वीकारून त्यांनी तेथील विश्वधर्म नि विश्वशांति परिषदांना स्तिमित केल.ते अठरा देशांच्या समितीचे सल्लागारही नियुक्त झाले. उत्तरी सीमेवरील १९६२ मध्ये चीनी आक्रमणात सैनिकांना प्रोत्साहन व १९६५ च्यापाकिस्तानी आक्रमणात लाहोर सीमा दौरा करुन लष्कराला जोश दिला. ११ दिवसात ११ हजार एकर भूमी भूदानात मिळविली. एकेका दिवशी १०, १० गावीची मंदिर हरिजनांना खुली केली, समयदान यज्ञात हजार ग्रामीणांची कवायत घेऊन कोटी तासांची भेट भगवान बुद्धाला वाहिली.*_

_*अश्याअनेक असंख्य योजनांना भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल,अशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाय योजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते.अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.*_

_*वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पाआहे. ||ग्रामगीता || ही जणू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय.*_

_*खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.*_

_*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता.आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचार सरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले.अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली.गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रता सारखे चालवीत आहेत.*_

_*महिलोन्नती हा ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे ग्रामगीतेत २० वा महीलोन्नती ह्या अध्यायात पटवून दिले.*_

_*देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन राष्ट्रसंत तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला.*_

_*ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे.त्यांनी मराठी प्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपति भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून डॉ राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर,१९६८) रोजी दुपारी ४.५८ ला देह ठेविला ! मृत्युंजयाचं एक प्रचंड वादळी जीवन ‘तुकड्या कहे आँधी लाऊं। मै भी मरकर जी जाऊँ ‘ हा संकल्प घेऊन विराम पावताच असंख्य नेते, मंत्री, संस्था, वृत्तपञ, महंत नि धर्मपंथ यांनी शोकविव्हल श्रद्धांजली वाहिली !*_

_*बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट !ओघ बारा वाटा मुरडाताती।।*_
_*हरिणीविण खारेपी पडियेली ओस।दशदिशा पाडसे भ्रमताती ।।*_
_*- संत नामदेव -*_
_*अशी अनुयायांची अवस्था होणं स्वाभाविकच आहे ! परंतु वं. राष्ट्रसंतांनी || ग्रामगीता || चा अमर ठेवा सर्वांसाठी देऊन ठेवला आहे ! त्यांचं समग्र जीवनदर्शन ‘जीवनयोगी राष्ट्रसंत ‘ या ग्रंथात उपलब्ध आहे !…..*_

_*🙏🏻🌷आज वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वाँ पुण्यतिथी महोत्सव अर्थात 🙏🏻सर्वसंत स्मृति ‘ मानवता दिन ‘ 🙏🏻*_
🌺 *वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली .* 🌺

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

one × four =